Home Cities मुक्ताईनगर मुक्ताईनगर नगरपंचायत निवडणुकीची उद्या मतमोजणी ; प्रशासनाचा कडक बंदोबस्त

मुक्ताईनगर नगरपंचायत निवडणुकीची उद्या मतमोजणी ; प्रशासनाचा कडक बंदोबस्त

0
137


मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या मुक्ताईनगर नगरपंचायतीच्या पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी रविवारी (२१ डिसेंबर) पार पडणार असून, या पार्श्वभूमीवर मुक्ताईनगर शहरात कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. निवडणूक प्रक्रिया शांततेत व सुरळीत पार पडावी यासाठी प्रशासनाने सर्व आवश्यक तयारी पूर्ण केली आहे.

मुक्ताईनगर नगरपंचायत निवडणुकीत एकूण ६४.४४ टक्के मतदान झाले असून, या मतदानाचा कौल आज स्पष्ट होणार आहे. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात सकाळी १० वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे. सर्वप्रथम टपाली मतदानाच्या ३० मतांची मोजणी केली जाणार असून, त्यानंतर मुख्य मतमोजणी प्रक्रियेला प्रारंभ होईल.

एकूण सात टेबलांवर चार फेऱ्यांमध्ये मतमोजणी होणार असून, यासाठी सुमारे ५० कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मतमोजणीची प्रक्रिया पारदर्शक व वेळेत पूर्ण करण्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार गिरीश वखारे यांनी दिली.

मतमोजणीच्या दिवशी शहरातील वाहतूक व्यवस्थेतही बदल करण्यात आले आहेत. बोदवड चौफुली ते बसस्थानकापर्यंतचा मुख्य रस्ता दोन्ही बाजूंनी वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. या मार्गावरील वाहतूक पर्यायी रस्त्यांवरून वळवण्यात येणार असून, नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी मतमोजणी स्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या ठिकाणी ६ पोलीस अधिकारी आणि १५० पोलीस कर्मचारी तैनात राहणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक आशिष आडसूळ यांनी दिली.

दरम्यान, नगरपंचायतीचा अंतिम निकाल जाहीर होईपर्यंत मुक्ताईनगर शहरातील सर्व दुकाने बंद ठेवण्याबाबत नोटीस जारी करण्यात आली आहे. सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी सुभाष जानोरे यांनी ही नोटीस काढली असून, नागरिकांनी शांतता राखून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

एकूणच मुक्ताईनगर नगरपंचायतीच्या निकालासाठी शहरासह संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले असून, प्रशासनाकडून सुरक्षितता, शिस्त आणि पारदर्शकतेवर भर देत मतमोजणीची प्रक्रिया पार पाडली जाणार आहे.


Protected Content

Play sound