
भडगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । दोन दिवसांपूर्वी आदर्श इंग्लिश स्कूलमधील नर्सरीत शिकणाऱ्या दोन निरागस चिमुकल्यांचा नाल्यात पडून जो दुर्दैवी मृत्यू झाला, त्या घटनेने संपूर्ण शहर सुन्न झाले आहे. या घटनेला जबाबदार असलेल्या व्यवस्थापनावर कठोर कारवाई व्हावी आणि पीडित चिमुकल्यांना न्याय मिळावा, या मागणीसाठी उद्या, शनिवार २० डिसेंबर रोजी ‘भडगाव बंद’ची हाक देण्यात आली आहे. भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्या वतीने ही घोषणा करण्यात आली असून नागरिकांनी या बंदमध्ये उत्स्फूर्त सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

या संदर्भात आज भडगाव येथील भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात एक महत्त्वाची संयुक्त पत्रकार परिषद पार पडली. यावेळी बोलताना भाजपचे तालुकाध्यक्ष अनिल वाघ आणि माजी तालुकाध्यक्ष सोमनाथ पाटील यांनी संबंधित शाळेच्या हलगर्जीपणावर तीव्र शब्दांत ताशेरे ओढले. “एका नामवंत शाळेच्या परिसरात अशा प्रकारची दुर्घटना घडणे हे गंभीर असून, याप्रकरणी प्रशासनाने केवळ कागदोपत्री कारवाई न करता प्रत्यक्ष दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत,” अशी आग्रही मागणी त्यांनी केली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे हर्षल पाटील आणि माजी नगरसेवक सचिन चोरडिया यांनी देखील या घटनेचा तीव्र निषेध केला. या बंदच्या माध्यमातून शाळा व्यवस्थापनाला आणि प्रशासनाला कठोर इशारा देण्यात येणार आहे.
या पत्रकार परिषदेला भाजपचे विनोद नेरकर, प्रदीप पाटील, निलेश पाटील, किरण शिंपी यांच्यासह दोन्ही पक्षांचे अनेक प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. उद्याच्या बंद काळात अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यापार, दुकाने आणि वाहतूक बंद ठेवून या निषेध आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन सर्वपक्षीय नेत्यांनी भडगावच्या जनतेला केले आहे. या घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात हळहळ व्यक्त होत असून आता सर्वांचे लक्ष प्रशासनाच्या पुढील भूमिकेकडे लागले आहे.



