Home Cities जळगाव नगरपरिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात 19 ते 21 डिसेंबरदरम्यान मद्यविक्री बंद

नगरपरिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात 19 ते 21 डिसेंबरदरम्यान मद्यविक्री बंद

0
100

जळगाव–लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या नगर परिषद व नगर पंचायत सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या कार्यक्रमानुसार जळगाव जिल्ह्यातील सहा नगरपरिषदांमध्ये मतदान व मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर निवडणूक प्रक्रिया शांततेत व कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने सुरळीत पार पडावी, यासाठी जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी 19 ते 21 डिसेंबरदरम्यान मद्यविक्री पूर्णतः बंद ठेवण्याचे आदेश जारी केले आहेत.

निवडणूक कार्यक्रमानुसार जळगाव जिल्ह्यातील भुसावळ, अमळनेर, सावदा, यावल, वरणगाव व पाचोरा या सहा नगरपरिषदांमधील नऊ प्रभागांमध्ये 20 डिसेंबर रोजी मतदान होणार असून 21 डिसेंबर रोजी मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे. सुधारित निवडणूक कार्यक्रमानुसार या नगरपरिषदांच्या काही जागांवर निवडणूक प्रक्रिया राबविण्यात येत आहे.

या पार्श्वभूमीवर 19 डिसेंबर रोजी मतदानाच्या आदल्या दिवशी, 20 डिसेंबर रोजी मतदानाच्या संपूर्ण दिवशी तसेच 21 डिसेंबर रोजी मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत जळगाव जिल्ह्यातील संबंधित नगरपरिषद व नगरपंचायत हद्दीतील ठोक व किरकोळ मद्यविक्री अनुज्ञप्ती बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यामध्ये जामनेर, अमळनेर, भडगाव, भुसावळ, चाळीसगाव, चोपडा, धरणगाव, एरंडोल, फैजपूर, मुक्ताईनगर, नशिराबाद, पाचोरा, पारोळा, रावेर, सावदा, शेंदुर्णी, वरणगाव व यावल या नगरपरिषद व नगरपंचायत क्षेत्रांचा समावेश आहे.

जिल्हा प्रशासनाने संबंधित सर्व ठोक व किरकोळ मद्यविक्री अनुज्ञप्तीधारकांना या आदेशाचे काटेकोर पालन करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या अनुज्ञप्तीधारकांविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949 अंतर्गत कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे.


Protected Content

Play sound