जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । विश्वासाचा फायदा घेत भाडेतत्त्वावर दोन चारचाकी वाहने घेऊन गेल्यानंतर ती परत न करता फसवणूक केल्याची घटना जळगाव शहरात उघडकीस आली आहे. आशाबाबा नगर येथील एका व्यक्तीसह त्यांच्या सहकाऱ्याची कार घेऊन संशयित आरोपी पसार झाला आहे. याप्रकरणी मंगळवारी १६ डिसेंबर रोजी दुपारी ४ वाजता रामानंदनगर पोलीस ठाण्यात विश्वासघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला.

आशाबाबा नगर परिसरातील रहिवासी प्रवीण रमेश पाटील (वय ४५) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, संशयित आरोपी ज्ञानेश्वर सुरेश पाटील (रा. तामगव्हाण, ता. चाळीसगाव) याने ६ नोव्हेंबर रोजी प्रवीण पाटील यांचा विश्वास संपादन केला. त्याने काही खासगी कामाचे कारण सांगून पाच दिवसांसाठी गाड्या भाड्याने देण्याची विनंती केली होती.

आरोपी ज्ञानेश्वर याने प्रवीण पाटील यांची इनोव्हा (MH 48 S 5895) आणि त्यांचे सहकारी गजानन चौधरी यांची स्विफ्ट डिझायर (MH 19 CU 6274) अशा दोन कार भाडेतत्त्वावर घेतल्या. पाच दिवसांची मुदत उलटून गेल्यानंतरही आरोपीने दोन्ही वाहने परत केली नाहीत. प्रवीण पाटील यांनी त्याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्याने टोलवाटोलवी केली आणि त्यानंतर दोन्ही वाहने घेऊन तो बेपत्ता झाला.
आपल्याला भाड्याचे पैसे तर मिळालेच नाहीत, उलट आपली लाखो रुपयांची वाहनेही चोरीला गेल्याचे लक्षात येताच प्रवीण पाटील आणि गजानन चौधरी यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. रामानंदनगर पोलिसांनी ज्ञानेश्वर सुरेश पाटील याच्या विरोधात विश्वासघात आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल प्रवीण जगदाळे करीत आहेत.



