जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । देशाच्या प्रथम महिला राष्ट्रपती व खान्देशच्या कन्या आदरणीय श्रीमती प्रतिभाताई पाटील यांच्या ९१ व्या वाढदिवसानिमित्त तसेच श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनाचे राष्ट्रीय अध्यक्ष सुप्रिमो स्व. दादा सुखदेवसिंह गोगामेडी यांच्या द्वितीय पुण्यस्मरण दिनाचे औचित्य साधून जळगाव शहरात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. समाजोपयोगी उपक्रमाच्या माध्यमातून दोन महान व्यक्तिमत्त्वांना अभिवादन करण्याचा हा उपक्रम नागरिकांमध्ये विशेष चर्चेचा विषय ठरत आहे.

हे रक्तदान शिबिर शुक्रवार, दि. १९ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता हिंदूसूर्य महाराणा प्रताप स्मारक चौक, प्रभात चौक, जळगाव येथे आयोजित करण्यात आले आहे. रक्तदानाच्या माध्यमातून गरजू रुग्णांचे प्राण वाचविण्याचा संकल्प या उपक्रमामागे असून, मोठ्या संख्येने रक्तदाते सहभागी होतील, असा आयोजकांचा विश्वास आहे.

या कार्यक्रमाचे उद्घाटन महामंडलेश्वर श्री स्वामी जनार्दन हरी जी महाराज (फैजपूर) यांच्या शुभहस्ते होणार आहे. कार्यक्रमास डॉ. के. बी. पाटील व उदयसिंह पाटील (जळगाव) यांची प्रमुख उपस्थिती लाभणार असून, विविध सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन प्रवीणसिंह पाटील (श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्ष) आणि प्रवीण सपकाळे (राज्य कार्याध्यक्ष – महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, मुंबई / प्रज्ञावंत फाउंडेशन, जळगाव) यांच्या वतीने करण्यात आले आहे. समाजसेवेच्या भावनेतून राबविण्यात येणारा हा उपक्रम जळगाव जिल्ह्यासाठी प्रेरणादायी ठरणार आहे.
कार्यक्रमासाठी सौजन्य म्हणून खान्देशातील विविध सामाजिक संस्था, फाउंडेशन्स, राजपूत परिवार, उद्योजक, लोकप्रतिनिधी आणि सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. महाराणा प्रतापसिंह स्मारक समिती संचालक मंडळ, जळगावसह अनेक प्रतिष्ठित मान्यवरांची उपस्थिती या कार्यक्रमास लाभणार आहे.
या रक्तदान शिबिरासाठी जिल्हा रुग्णालय रक्तपेढी, जळगाव यांचे विशेष सहकार्य लाभणार असून, रक्तसंकलनाची प्रक्रिया वैद्यकीय नियमांचे पालन करून सुरक्षितपणे पार पाडली जाणार आहे. नागरिकांच्या आरोग्याची पूर्ण काळजी घेण्यात येणार असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले आहे.
या सामाजिक उपक्रमात जास्तीत जास्त रक्तदात्यांनी सहभाग नोंदवून गरजू रुग्णांचे प्राण वाचविण्यास हातभार लावावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. सामाजिक बांधिलकी जपत राबविण्यात येणारा हा उपक्रम जळगाव शहराच्या सामाजिक एकतेचे दर्शन घडवणारा ठरणार आहे.
या रक्तदान शिबिराच्या माध्यमातून समाजहितासाठी एकत्र येण्याचा संदेश देत, प्रतिभाताई पाटील यांच्या दीर्घायुष्याला शुभेच्छा आणि स्व. दादा गोगामेडी यांना आदरांजली अर्पण करण्यात येणार आहे.



