Home आरोग्य डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात ७० वर्षीय महिलेच्या नासूरवर यशस्वी शस्त्रक्रिया 

डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात ७० वर्षीय महिलेच्या नासूरवर यशस्वी शस्त्रक्रिया 

0
103

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव येथील डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात कान-नाक-घसा तज्ज्ञांच्या टीमने अत्यंत गुंतागुंतीची आणि जोखमीची शस्त्रक्रिया यशस्वी करून वैद्यकीय क्षेत्रात पुन्हा एकदा आपली कौशल्यपूर्ण छाप उमटवली आहे. ७० वर्षीय महिला रुग्णाच्या नासूरवर करण्यात आलेली डॅक्रो-सिस्टो-र्हायनोस्टोमी शस्त्रक्रिया यशस्वी ठरली असून रुग्णाला अनेक वर्षांच्या त्रासातून दिलासा मिळाला आहे.

खंडाळा येथील अंजनाबाई चव्हाण (वय ७०) या गेल्या दहा वर्षांपासून डाव्या डोळ्यातून सतत पाणी येणे, तसेच नाकाच्या बाजूला फोड होऊन त्यातून दुर्गंधीयुक्त घाण बाहेर पडणे या गंभीर समस्येला सामोरे जात होत्या. दीर्घकाळ चाललेल्या या त्रासामुळे त्या शारीरिक वेदनांसह मानसिक तणावातही होत्या. अनेक उपचार करूनही फरक न पडल्याने अखेर त्यांनी जळगावातील डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात उपचारासाठी धाव घेतली.

रुग्णाची प्राथमिक तपासणी कान-नाक-घसा विभागाच्या प्रमुख डॉ. अनुश्री अग्रवाल यांनी केली. तपासणीमध्ये डोळा आणि नाक यांना जोडणाऱ्या अश्रुधारांच्या मार्गात अडथळा निर्माण होऊन नासूर तयार झाल्याचे निदर्शनास आले. दीर्घकाळ उपचार न झाल्यामुळे ही समस्या अधिक गंभीर बनली होती. त्यातच रुग्णाला हृदयविकार व उच्च रक्तदाबाचा आजार असल्याने शस्त्रक्रिया करणे अत्यंत धोकादायक ठरू शकत होते.

रुग्णाच्या वाढत्या वेदना आणि गुंतागुंतीचा विचार करता डॉ. अनुश्री अग्रवाल आणि त्यांच्या टीमने सर्व जोखीम स्वीकारून शस्त्रक्रियेचा निर्णय घेतला. शस्त्रक्रियेपूर्वी सर्व आवश्यक तपासण्या, हृदयविकार तज्ज्ञांचे प्री-अनेस्थेटिक मूल्यांकन आणि विशेष वैद्यकीय काळजी घेण्यात आली. त्यानंतर अत्यंत सूक्ष्म आणि तांत्रिक कौशल्याची आवश्यकता असलेली डॅक्रो-सिस्टो-र्हायनोस्टोमी शस्त्रक्रिया नियोजित पद्धतीने पार पाडण्यात आली.

सुमारे दीड ते दोन तास चाललेल्या या शस्त्रक्रियेद्वारे अश्रुधारांचा बंद झालेला मार्ग उघडून नवीन नैसर्गिक मार्ग तयार करण्यात आला. कोणतीही गुंतागुंत न होता शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण झाली. शस्त्रक्रियेनंतर काही तासांतच रुग्णाची प्रकृती स्थिर झाली असून डोळ्यातून येणारे पाणी थांबले आहे, तसेच नाकाजवळील फोड व नासूरातून होणारा दाहही लक्षणीयरीत्या कमी झाला आहे.

सध्या रुग्ण डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली असून तिची प्रकृती समाधानकारक असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे. या शस्त्रक्रियेसाठी डॉ. पंकजा बेंडाळे, डॉ. सृष्टी पाटील, डॉ. शुभम सावरकर, डॉ. पंकज शर्मा आणि डॉ. अंकीत सोलंकी यांनी महत्त्वाचे सहकार्य केले.

दीर्घकाळापासून असलेला आजार, वयोमान आणि हृदयविकार व उच्च रक्तदाबासारख्या जोखमी असूनही योग्य नियोजन, अनुभवी डॉक्टरांची टीम आणि अत्याधुनिक उपकरणांच्या मदतीने ही शस्त्रक्रिया सुरक्षितरीत्या पार पडल्याचे डॉ. अनुश्री अग्रवाल यांनी सांगितले.

या यशस्वी शस्त्रक्रियेमुळे रुग्णाला नवजीवन मिळाले असून जळगावातील वैद्यकीय सेवांच्या दर्जावर पुन्हा एकदा विश्वास दृढ झाला आहे.


Protected Content

Play sound