
मुंबई-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा । मुंबई महापालिका निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होताच राजकीय हालचालींना वेग आला असून महायुतीतील अंतर्गत समीकरणे पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहेत. महापालिका निवडणुका एकत्र लढवण्याचा निर्णय वरिष्ठ पातळीवर झाला असला, तरी जागावाटपावरून भाजप आणि शिंदेसेना यांच्यात तणाव वाढताना दिसत आहे.

मुंबईत भाजप १३० ते १५० जागा लढवण्यावर ठाम असून, शिंदेसेनेनेही १०० ते १२५ जागांची मागणी केल्याने रस्सीखेच तीव्र झाली आहे. त्यामुळे मुंबईत महायुतीतील दोन्ही प्रमुख पक्षांमध्ये समन्वय राखणे हे मोठे आव्हान ठरण्याची चिन्हे आहेत. आज महायुतीच्या समन्वय समितीची बैठक होणार असली, तरी त्याआधीच जागावाटपावरून मतभेद उफाळून आले आहेत.
मुंबईत शिंदेसेनेला तुलनेने कमी आणि ठाण्यात भाजपाला कमी जागा देण्याबाबतही चर्चांचे फेरे सुरू आहेत. याच पार्श्वभूमीवर मुंबईत एकत्र लढण्याचा आणि ठाणे तसेच कल्याण-डोंबिवलीत स्वतंत्र रणनीती आखण्याचा प्लॅनही तयार करण्यात आला आहे. मुंबई महापालिकेत भाजप ‘मोठा भाऊ’ म्हणून भूमिका बजावण्याच्या तयारीत आहे, तर ठाण्यात शिंदेसेना प्रमुख ताकद म्हणून पुढे येत आहे.
कल्याण-डोंबिवली महापालिकेत दोन्ही पक्षांचे प्राबल्य असल्याने तेथील निकालानंतरच महापौरपदाचा तिढा सुटणार असल्याचे संकेत आहेत. जागावाटपावरून तणाव वाढल्यास काही प्रमाणात वाद होण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
दरम्यान, नवाब मलिक यांच्या भूमिकेमुळे मुंबईतील राजकीय समीकरणे अधिक गुंतागुंतीची झाली आहेत. नवाब मलिक मुंबईत नेतृत्व करणार असतील तर भाजप राष्ट्रवादीसोबत युती करणार नाही, ही आमची सुरुवातीपासूनची भूमिका असल्याचे भाजपाचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांनी स्पष्ट केले. त्यामुळे मलिकांसोबत जाण्याचा प्रश्नच नसल्याचे भाजपाकडून ठामपणे सांगण्यात आले आहे.
दुसरीकडे, अजित पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस नवाब मलिक यांच्याकडेच मुंबईचे नेतृत्व देण्यावर ठाम आहे. आज मलिकांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीची महत्त्वाची बैठक होणार असून, त्यामुळे मुंबईत महायुतीत बिघाडी झाल्याचे स्पष्ट चित्र समोर येत आहे.
या सर्व पार्श्वभूमीवर आज दादर येथील कार्यालयात शिंदेसेना-भाजपाची संयुक्त बैठक पार पडणार आहे. भाजपाकडून मुंबई अध्यक्ष अमित साटम, निवडणूक प्रभारी आशिष शेलार, आमदार अतुल भातखळकर आणि आमदार प्रवीण दरेकर उपस्थित राहणार आहेत. शिंदेसेनेकडून उदय सामंत, रवींद्र वायकर, राहुल शेवाळे, प्रकाश सुर्वे आणि शीतल म्हात्रे या बैठकीत सहभागी होणार आहेत. भाजप मुंबईत १५० जागा लढवण्यावर आग्रही असून, शिंदेसेना १०० जागांवर तयारी करत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
एकूणच मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील अंतर्गत तणाव, जागावाटपाची रस्सीखेच आणि नवाब मलिक यांच्यामुळे निर्माण झालेली राजकीय कोंडी यामुळे येत्या काळात राजकीय घडामोडी अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.



