
वरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मुक्ताईनगर येथील मुक्ताई देवीच्या दर्शनाहून परतणाऱ्या भाविक महिलांच्या रिक्षाला भरधाव वेगाने येणाऱ्या शिफ्ट कारने जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात रिक्षा चालक आणि रिक्षातील सात महिला भाविक अशा एकूण आठ जण जखमी झाल्याची घटना सोमवारी १५ डिसेंबर सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास हतनूर फॅक्टरी रस्त्यावरील पवननगर परिसरात घडली. अपघातानंतर वरणगाव ग्रामीण रुग्णालयात मोठी गर्दी झाली होती.

रावेर तालुक्यातील उदळी येथील सात महिला एकादशीनिमित्त मुक्ताईनगर येथे दर्शनासाठी गेल्या होत्या. दर्शन आटोपल्यानंतर त्या रिक्षा क्रमांक (एम.एच. १९ व्ही ८४४०) मधून आपल्या उदळी गावाकडे परतत होत्या. त्याचवेळी समोरून भरधाव वेगाने आलेल्या एका शिफ्ट कारने रिक्षाला इतकी जोरदार धडक दिली की, रिक्षा रस्त्यावर पलटी झाली आणि मोठा अपघात झाला.
या अपघातात रिक्षा चालक धनंजय जावरे यांच्यासह उदळी येथील भागेश्री जगदीश पाटील, कलाबाई पुंडलिक कोळी, रेखाबाई राजेंद्र गोसावी, मिराबाई तुकाराम भोई, उषाबाई सभाजी पाटील, वदना लक्ष्मण पाटील आणि कविता सुनील भोलाणे या सात महिला भाविक जखमी झाल्या.
जखमींना तातडीने वरणगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर काही गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी जळगाव किंवा इतरत्र हलवण्यात आले आहे.



