

जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । आगामी जळगाव महानगरपालिका निवडणुकीचे बिगूल वाजताच सर्वच राजकीय पक्षांनी आपली कंबर कसली आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटानेही उमेदवारांच्या चाचपणीला जोरदार सुरुवात केली आहे. सोमवारी शहरातील केमिस्ट भवन येथे महापालिका निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या संभाव्य उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. यावेळी इच्छुकांची मोठी गर्दी पहायला मिळाली.
या मुलाखती सत्राला पक्षाचे प्रमुख नेते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यात जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार किशोर पाटील, आमदार चंद्रकांत सोनवणे, जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे आणि महिला जिल्हाप्रमुख सरिता माळी-कोल्हे यांचा सहभाग होता. या नेत्यांनी प्रभागनिहाय इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या आणि त्यांच्या विजयाच्या संभाव्यता, जनसंपर्क तसेच पक्षासाठी केलेल्या कार्याची माहिती घेतली.
जळगाव महानगरपालिकेच्या सर्वच प्रभागांमधून मोठ्या संख्येने इच्छुकांनी मुलाखतीसाठी गर्दी केली होती. केमिस्ट भवनमध्ये उमेदवारीसाठी उत्सुक असलेल्या कार्यकर्त्यांची गर्दी इतकी मोठी होती की, संपूर्ण मुलाखत स्थळाला जणू एका यात्रेचे स्वरूप आले होते. या प्रचंड गर्दीवरून शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये निवडणुकीबाबत किती उत्साह आहे, हे दिसून आले.
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व इच्छुकांना मुलाखतीची संधी देण्यात आली. यशस्वी उमेदवारांची निवड करताना पक्षाची निष्ठा आणि मतदारांशी असलेला मजबूत संपर्क या दोन गोष्टींना प्राधान्य दिले जाईल, असे संकेत यावेळी देण्यात आले.



