जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । शहरातील आकाशवाणी चौक परिसरात असलेल्या महादेव हॉस्पिटलमध्ये नाभीच्या हर्नियावर यशस्वी शस्त्रक्रिया करून एका प्रौढ रुग्णाला मोठा दिलासा मिळाला आहे. शल्यचिकित्सा विभागाच्या या यशामुळे रुग्णांसह त्यांच्या कुटुंबीयांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत असून, आधुनिक उपचार सुविधा आणि तज्ज्ञ वैद्यकीय पथकामुळे ही शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे.

जळगाव शहरातील ४५ वर्षीय व्यक्तीला गेल्या काही काळापासून पोटाजवळ गाठ जाणवत होती. विविध ठिकाणी उपचार करूनही कोणताही ठोस फरक न पडल्याने अखेर नातेवाईकांनी त्यांना महादेव हॉस्पिटलमध्ये दाखल केले. येथे सखोल तपासणी केल्यानंतर शल्यचिकित्सा विभागातील डॉक्टरांनी नाभीच्या ठिकाणी हर्निया असल्याचे निदान केले. नाभीचा हर्निया म्हणजे पोटातील आतड्याचा काही भाग किंवा पोटातील चरबी नाभीच्या आसपासच्या कमकुवत स्नायूंमधून बाहेर येणे, ज्यामुळे नाभीजवळ गाठ तयार होते आणि वेदना तसेच दैनंदिन कामकाजात अडथळे निर्माण होतात.

रुग्णाच्या प्रकृतीचा सखोल अभ्यास करून वैद्यकीय पथकाने शस्त्रक्रिया हाच योग्य उपचार असल्याचा निर्णय घेतला. त्यानुसार सोमवारी नियोजित पद्धतीने शस्त्रक्रिया करण्यात आली आणि ती पूर्णतः यशस्वी ठरली. शस्त्रक्रियेनंतर रुग्णाची प्रकृती स्थिर असून त्यांना लक्षणीय आराम मिळाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
ही शस्त्रक्रिया शल्यचिकित्सा विभागप्रमुख डॉ. शिवाजी सादूलवाड यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. परीस वाळे, डॉ. अपूर्वा गवई आणि डॉ. प्रज्योत कदम यांनी पार पाडली. बधिरीकरण विभागातील डॉ. भारत सोनवणे, डॉ. मारिया आणि डॉ. सोनाली यांनी भूलतज्ज्ञ म्हणून सहकार्य केले, तर ऑपरेशन थिएटरमध्ये ओटी सहायक असीम शेख आणि सिद्धिक मण्यार यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. संपूर्ण वैद्यकीय पथकाच्या समन्वयामुळे ही शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याचे हॉस्पिटल प्रशासनाने सांगितले.



