Home Cities जळगाव जळगाव महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) गटाचे जयसिंगराव गायकवाड यांचा दौरा

जळगाव महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) गटाचे जयसिंगराव गायकवाड यांचा दौरा


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय मंत्री जयसिंगराव गायकवाड यांचा १६ आणि १७ डिसेंबर २०२५ रोजी जळगाव शहरात दोन दिवसीय दौरा आयोजित करण्यात आला आहे. या दौऱ्यादरम्यान पक्षाची महत्त्वपूर्ण महानगर बैठक तसेच महापालिका निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जाणार असल्याने राजकीय हालचालींना वेग आला आहे.

मंगळवार, १६ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी पाच वाजता माजी मंत्री जयसिंगराव गायकवाड यांच्या उपस्थितीत जळगाव शहरात राष्ट्रवादी काँग्रेसची महानगर बैठक होणार आहे. या दिवशी महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने पक्षाची रणनीती, संघटनात्मक तयारी तसेच पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यात येणार आहे. यानंतर शहरातील प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या घरी भेटी देण्याचा कार्यक्रमही नियोजित असून, रात्री जळगावमध्ये मुक्काम राहणार आहे.

बुधवार, १७ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी दहा वाजता जळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात महापालिका निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांच्या अधिकृत मुलाखती घेतल्या जाणार आहेत. महापालिकेच्या प्रत्येक प्रभागातून इच्छुक असलेल्या उमेदवारांनी आपल्या प्रभागाचा लेखी अहवाल सादर करून मुलाखतीसाठी उपस्थित राहावे, असे आवाहन पक्षाकडून करण्यात आले आहे.

या दोन्ही महत्त्वाच्या कार्यक्रमांना राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार एकनाथराव खडसे, प्रदेश सरचिटणीस भैय्यासाहेब रविंद्र पाटील, महिला आघाडीच्या प्रदेश अध्यक्षा रोहिणी खडसे खेवलकर, जळगाव जिल्हाध्यक्ष प्रमोदबापू पाटील, माजी खासदार ईश्वरलाल जैन, जिल्हा निरीक्षक भास्करराव काळे तसेच माजी आमदार संतोष चौधरी यांची उपस्थिती राहणार आहे.

जळगाव शहर महानगरपालिका निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेल्या सर्व उमेदवारांनी बुधवार, १७ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी दहा वाजता जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात आपल्या प्रभागातील परिस्थितीचा सविस्तर अहवालासह उपस्थित राहावे, असे आवाहन महानगर जिल्हाध्यक्ष ईजाज मलिक यांनी केले आहे..


Protected Content

Play sound