वरणगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । भुसावळ तालुक्यातील वरणगाव शहरात गोवंश हत्या व गोमांस विक्री खुलेआम सुरू असल्याचा आरोप पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. नागरिकांच्या आरोग्याला धोका, परिसरातील दुर्गंधी, तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न कायम उपस्थित असल्याने या प्रकरणाकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी जोर धरू लागली आहे. प्रतिभा नगर परिसरात अनधिकृतपणे उभारण्यात आलेले पतरी शेड व गोठे तात्काळ निकामी करावेत, अशी ठाम मागणी करत जाफर अली मकसुदअली ऊर्फ हिप्पी शेठ यांनी वरणगाव नगर परिषदेकडे नागरिकांच्या सह्यांचे निवेदन सादर केले आहे.
वरणगाव येथे गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेला गोमांस विक्रीचा व्यवसाय सध्या शहरात चर्चेचा विषय ठरला आहे. पूर्वी गावकुसाबाहेर असलेला कत्तलखाना आणि त्याचा परिसर आता वस्तीमध्ये समाविष्ट झाल्याने हिंदू-मुस्लीम नागरिकांचे वास्तव्य वाढले आहे. कत्तलखान्यामुळे परिसरात तीव्र दुर्गंधी पसरत असून कुत्रे व मांजरे रक्ताने माखलेले अवयव घरांजवळ आणत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.
नागरिकांनी कत्तलखाना बंद करण्याची मागणी केल्यानंतर काही वेळा तणावपूर्ण स्थिती निर्माण होऊन हाणामाऱ्या झाल्याचे प्रकारही समोर आले आहेत. सध्या पुन्हा कत्तलखान्याला गावकुसाबाहेर परवाना द्यावा, अशी मागणी काही व्यावसायिकांकडून होत असल्याची माहिती आहे. प्रत्यक्षात या कत्तलखान्यात दररोज दहा ते बारा गोवंशाची कत्तल होत असून, मोठ्या शहरांसह इतर ठिकाणी मांस पाठवले जाते. जवळपास चार ते पाच टन गोमांस वरणगावातील लोहार दरवाजा परिसरातील बीफ मार्केटमध्ये विक्रीसाठी आणले जाते, असा दावा निवेदनात करण्यात आला आहे.
या व्यवसायासाठी बाहेर राज्यातून वाहतूक करून आणलेली जनावरे प्रतिभा नगरातील कुरेशी परिसरात ठेवण्यात येतात. येथे आठ ते दहा पतरी शेड व गोठ्यांमध्ये सुमारे दोनशे जनावरे कत्तलीच्या उद्देशाने कोंबून ठेवली जात असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे हे सर्व गोठे व शेड वरणगाव नगर परिषदेची कोणतीही परवानगी न घेता उभारण्यात आल्याचे निवेदनातून स्पष्ट झाले आहे.
या प्रकरणी प्रशासनाने गांभीर्याने दखल घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात असतानाही अद्याप ठोस कारवाई झालेली नाही. जाफर अली मकसुदअली हिप्पी शेठ यांनी यापूर्वीही वारंवार निवेदने, अर्ज तसेच तोंडी तक्रारी केल्या असल्याचे नमूद करण्यात आले आहे. मात्र, प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. या निवेदनावर मनोज चौधरी, गंगाराम चौधरी, संजय चौधरी, विजय चौधरी, राजेश शर्मा, अबरार खाटीक, अरबाज खाटीक, आवेल अली, सुभाष धनगर, हेमराज धनगर, संदीप भोई, सोहम तायडे, मोसीम खाटीक, तैकुर खाटीक, सोयेबर खाटीक, साबीर खाटीक, आदील शहा, नोमान शहा, मुस्तकिम शहा, फैजान पठाण यांसह अनेक रहिवाशांच्या सह्या आहेत.
या संदर्भात वरणगाव नगर परिषदेचे मुख्याधिकारी सचिन राऊत यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, प्रतिभा नगरातील काही नागरिकांनी अवैध गुरांचे शेड निकामी करण्याबाबत निवेदन दिले आहे. सध्या स्थानिक निवडणुकांमुळे प्रशासकीय यंत्रणा व्यस्त असून निवडणुका पार पडल्यानंतर या विषयावर विचार करण्यात येईल.
एकूणच, वरणगावमध्ये खुलेआम सुरू असल्याचा आरोप असलेल्या गोहत्त्या, अवैध गोठे आणि कत्तलखान्यांमुळे नागरिकांमध्ये तीव्र असंतोष आहे. प्रशासनाने तातडीने ठोस कारवाई करून कायदा-सुव्यवस्था व सार्वजनिक आरोग्य अबाधित ठेवावे, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.



