ब्रह्मलीन जगन्नाथजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त भव्य कार्यक्रम


फैजपूर, ता. यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । ब्रह्मलीन गुरूवर्य जगन्नाथजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त सतपंथ देवस्थानाच्या वतीने आजपासून कार्यक्रम सुरू झाले असून उद्या रविवारी भव्य कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

सतपंथ देवस्थानाचे गादीपती महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांचे गुरूवर्य तथा सतपंथ देवस्थानाचे अकरावे ब्रह्मलीन गादीपती जगन्नाथजी महाराज यांच्या चोवीसाव्या पुण्यतिथीच्या निमित्ताने निष्कलंकधाम येथे शनिवारपासून कार्यक्रम सुरू झालेले आहेत. यात प्रामुख्याने आज पुण्यतिथी महापूजा, नाम संकीर्तन व महाप्रसादाचा समावेश होता. तर, उद्या रविवारी सकाळी सात वाजता भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे. यानंतर सकाळी नऊ वाजता समाधी स्थळावर पादूका पूजन करण्यात येणार आहे. सकाळी दहा ते दुपारी साडेबारा या कालावधीत धर्मसभेचे आयोजन करण्यात आले असून यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला आहे. याप्रसंगी फैजपूर येथील श्रीमती सुमनबाई प्रेमचंद सोनवणे यांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमाला परिसरातील सर्व संतमंडळी, हभप महाराज मंडळी, टाळकरी मंडळी, पंचक्रोशीतील सन्माननीय लोकप्रतिनिधी आणि महाराष्ट्र, मध्यप्रदेश व गुजरातमधील समस्त सतपंथ मुखी परिवाराची उपस्थिती राहणार आहे. या कार्यक्रमाला भाविकांनी उपस्थित रहावे असे आवाहन सतपंथ देवस्थानाचे गादीपती महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज, सतपंथ चॅरीटेबल ट्रस्ट, श्री निलकंठ जगन्नाथ गोशाळा, वढोदे, तुलसी हेल्थकेअर सेंटर आणि समस्त सतपंथ परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.