नागपूर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा । महाराष्ट्रात अलिकडेच आलेल्या पुरामुळे तात्पुरती स्थगिती आलेली ‘मुख्यमंत्र्यांची समृद्ध पंचायत राज मोहीम’ आता नव्या जोमाने पुन्हा सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे राज्यातील गावे समृद्धीकडे वाटचाल करतील, असा ठाम विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. विधानभवनातील मंत्रिमंडळ सभागृहात या मोहिमेच्या शीर्षकगीताचे प्रकाशन करताना त्यांनी राज्यभरातील सरपंच, ग्रामविकास अधिकारी, गटविकास अधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दूरदर्शनद्वारे मार्गदर्शन केले.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, गेल्या दहा वर्षांत राज्यात राबविण्यात आलेल्या प्रत्येक यशस्वी मोहिमेच्या पाठीमागे लोकसहभाग हा कणा ठरला आहे. लोकांचा सक्रिय सहभाग नसेल तर कोणतीही योजना किंवा मोहीम यशस्वी होऊ शकत नाही, हे अनुभवातून स्पष्ट झाले आहे. जलयुक्त शिवार अभियानाचा दाखला देत त्यांनी सांगितले की, या उपक्रमामुळे जलसाक्षरता वाढली, पाणी साठवणूक क्षमता सुधारली आणि महाराष्ट्र देशासाठी एक आदर्श ठरला.

गावांच्या सर्वांगीण विकासासाठी समृद्ध पंचायत राज मोहीम अत्यंत महत्त्वाची असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी अधोरेखित केले. ग्रामपंचायती डिजिटल, स्वावलंबी आणि पर्यावरणपूरक बनविण्यासाठी ही मोहीम निर्णायक ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ग्रामसभांच्या माध्यमातून लोकसहभाग वाढविला जाणार असून, या मोहिमेचा प्रचार आणि जनजागृती करण्यासाठी विविध क्षेत्रातील कलाकार देखील सहभागी होतील, असेही त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमात ग्रामीण विकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे उपस्थित होते. त्यांनी पार्श्वभूमी भाषणात मोहिमेच्या उद्दिष्टांची सविस्तर माहिती दिली. ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डावले यांनी उपस्थितांचे आभार मानले. अभिनेते भारत गणेशपुरे, संदीप पाठक, पृथ्वी प्रताप, अभिनेत्री शिवली परब यांच्यासह संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी या कार्यक्रमाला उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, या मोहिमेमुळे गावागावांत विकासासाठी निरोगी आणि सकारात्मक स्पर्धा निर्माण होईल. त्यामुळे प्रत्येक ग्रामपंचायतीने पुढाकार घेऊन या मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवावा आणि ती यशस्वी करावी, असे आवाहन त्यांनी केले. केंद्र व राज्य शासनाच्या योजनांची अंमलबजावणी अधिक परिणामकारक व्हावी, यासाठी ही मोहीम लोकचळवळीच्या स्वरूपात राबविली जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
‘मुख्यमंत्र्यांची समृद्ध पंचायत राज मोहीम’ २०२५-२६ पासून तालुका, जिल्हा, महसूल विभाग आणि राज्य या चारही स्तरांवर स्पर्धात्मक पद्धतीने राबविण्यात येत आहे. ग्रामपंचायतींना कार्यक्षम, सुशासित आणि जलसंपन्न बनविणे, स्वच्छ व हरित गावे उभारणे, मनरेगा व इतर योजनांचे एकत्रीकरण, उपजीविका विकास, सामाजिक न्याय आणि लोकसहभागातून स्वयंसेवी श्रमाला चालना देणे, ही या मोहिमेची प्रमुख उद्दिष्टे आहेत. या उपक्रमांतर्गत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायतींना विविध स्तरांवर पुरस्कार देण्यात येणार आहेत.



