यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील किनगावजवळ डोणगाव रोडवरील इंग्लिश मीडियम निवासी पब्लिक स्कूलमध्ये ‘साप्ताहिक क्रीडा महोत्सव’ उत्साहात सुरू झाला आहे. विद्यार्थ्यांच्या शारीरिक आणि मानसिक विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी या महोत्सवात विविध स्पर्धात्मक आणि मनोरंजक खेळांचे आयोजन करण्यात आले आहे.

या क्रीडा महोत्सवात कबड्डी, क्रिकेट, खो-खो, भालाफेक, थाळीफेक, गोळाफेक यांसारख्या पारंपारिक खेळांसह नींबू-चमचा, गाढवाला शेपूट लावणे आणि रनिंग अशा विविध खेळांचा समावेश आहे. या कार्यक्रमाचा शुभारंभ चेअरमन विजयकुमार देवचंद पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाला. प्रमुख अतिथी म्हणून माजी क्रीडा समन्वयक के. यू. पाटील उपस्थित होते. सुरुवातीला माता सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

प्रमुख अतिथी के. यू. पाटील यांनी मनोगतातून खेळाचे महत्त्व स्पष्ट केले. खेळामुळे शारीरिक सुदृढता, मानसिक आणि बौद्धिक विकास कसा साधता येतो, याचे महत्त्व त्यांनी उदाहरणांसह विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. तसेच, चेअरमन विजयकुमार पाटील यांनी मुलींनीही क्रीडा क्षेत्रात सक्रिय योगदान दिल्यास त्या उच्च पातळीवर यश मिळवू शकतात, असे मत व्यक्त केले.
मान्यवरांच्या हस्ते खेळांमधील सर्व साहित्यांचे पूजन करून क्रीडा महोत्सवाचा प्रारंभ करण्यात आला. वैशाली मराठे यांनी प्रास्ताविक केले तर तिलोत्तमा महाजन यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.



