Home धर्म-समाज यावल–फैजपूर राष्ट्रीय महामार्ग बनला ‘मृत्यूचा सापळा’ : तात्काळ दुरुस्तीची मागणी

यावल–फैजपूर राष्ट्रीय महामार्ग बनला ‘मृत्यूचा सापळा’ : तात्काळ दुरुस्तीची मागणी

0
143

यावल–लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । यावल ते फैजपूर या राष्ट्रीय महामार्गावरील दयनीय परिस्थितीमुळे नागरिकांचे हाल वाढले असून, हा रस्ता प्रत्यक्षात “मृत्यूचा सापळा” बनल्याची भावना स्थानिकांमध्ये तीव्र होत आहे. रस्त्यात ठिकठिकाणी पडलेल्या मोठ्या खड्ड्यांमुळे वाहनधारकांना धोका पत्करून प्रवास करावा लागत असून, गेल्या काही दिवसांत झालेल्या अपघातांनी या समस्येची गंभीरता अधिक वाढवली आहे.

यावल ते फैजपूर या एकूण १७ किलोमीटरच्या राष्ट्रीय महामार्गावरील रस्ता मोठ्या प्रमाणात खराब झाला आहे. पावसाळा ओसरूनही मोठमोठे खड्डे कायम राहिल्याने वाहनधारकांना वाहन चालवणे अक्षरशः जिकिरीचे झाले आहे. महामार्गाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या समस्येकडे तातडीने लक्ष देत रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे.

फैजपूर हे तालुक्यातील महत्त्वाचे व्यापारी केंद्र असून, येथे कॉलेज, महाविद्यालये, औद्योगिक वसाहतीमुळे दररोज मोठ्या प्रमाणावर नागरिकांची वर्दळ असते. या दृष्टीने हा राष्ट्रीय महामार्ग अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. मात्र सध्याच्या खराब अवस्थेमुळे संपूर्ण मार्गावर झालेली रस्त्याची वाताहत वाहनधारकांसाठी धोक्याचे वातावरण निर्माण करत आहे. अनेकांना जीव मुठीत धरून वाहने चालवावी लागत आहेत.

दरम्यान, मागील काही दिवसांत या रस्त्यावर अनेक अपघात झाले असून त्यात निरपराध नागरिकांनी जीव गमावले आहेत. या पार्श्वभूमीवर लोकप्रतिनिधींनी या गंभीर प्रश्नाकडे तात्काळ लक्ष देत खड्डेमय महामार्गाची दुरुस्ती करण्याची मागणी सर्वत्र होत आहे. नागरिकांचे म्हणणे आहे की, दुर्लक्ष केल्यास परिस्थिती आणखी भयावह होऊ शकते.


Protected Content

Play sound