Home क्राईम पहूर येथे भर दिवसा घरफोडीचा प्रयत्न ; वाढत्या चोरीच्या घटनांमुळे नागरीक त्रस्त

पहूर येथे भर दिवसा घरफोडीचा प्रयत्न ; वाढत्या चोरीच्या घटनांमुळे नागरीक त्रस्त

0
140

पहूर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । पहूर येथील संतोषी माता नगरात दुपारी उघडपणे झालेल्या घरफोडीच्या प्रयत्नाने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या काही दिवसांत सलग घडणाऱ्या चोरीच्या घटनांमुळे चोरट्यांचे मनोबल वाढल्याचे चित्र दिसत असून पोलिस तपासाची गती अपुरी असल्याची स्थानिकांची भावना आहे.

आज दुपारी साधारण अडीच ते तीनच्या सुमारास धनराज चौधरी हे पत्नीसह शेतावर गेले असताना त्यांच्या घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश केला. घरात शिरताच टीव्ही सुरू करून घरातील सामान अस्ताव्यस्त करत त्यांनी भरदिवसा चोरीचा प्रयत्न केला. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिक धावून गेले तसेच पहूर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी पोहोचून पाहणी केली.

या घटनेची पार्श्वभूमी आणखी चिंताजनक आहे. कारण अवघ्या सात दिवसांपूर्वी, म्हणजेच ३ डिसेंबर २०२५ रोजी, संतोषी माता नगरालगत असलेल्या लक्ष्मी नगरातही भर दिवसा घरफोडी झाली होती. संत रुपलाल महाराज मंदिरासमोर राहणारे गजानन रघुनाथ गोंदनखेडे यांच्या घरी दुपारी दोन ते अडीचच्या सुमारास घडलेल्या या घरफोडीत दीड लाख रुपये रोख आणि दोन तोळे सोन्यासह एकूण चार लाख रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला होता.

याच दिवशी पहूर पेठ येथील आठवडे बाजारात दिलीप बारी (फुसे) यांच्या ‘जय रेणुका टी सेंटर’ मधूनही भर दुपारी दोन हजार रुपये असलेला गल्ला अज्ञात चोरांनी चोरून नेला होता. या सलग घटनांमुळे बाजारपेठ आणि निवासी भाग दोन्ही ठिकाणी असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.

गेल्या आठवड्यातील तिन्ही घटनांतील चोर अद्याप पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. त्यातच आज पुन्हा भर दिवसा झालेल्या चोरीच्या प्रयत्नामुळे चोरट्यांचे धाडस अधिकच वाढल्याचे स्पष्ट दिसत आहे. रात्रीची गस्त वाढवण्यात आली असल्याचा पोलिसांचा दावा असला तरी प्रत्यक्ष तपासाची गती व परिणामकारकता याबाबत स्थानिक नागरिक नाराजी व्यक्त करत आहेत. या घटनांची मालिका रोखण्यासाठी आणि आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी जोर धरत आहे.


Protected Content

Play sound