बसमधील गर्दीचा फायदा घेणाऱ्या पाकिटमारांची टोळी जेरबंद; एमआयडीसी पोलीसांची कारवाई !

0
146

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशाच्या पँटच्या खिशातून १५ हजार रुपये रोख रक्कम काढून घेणाऱ्या तीन सराईत पाकिटमारांना एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. गुप्त माहिती आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे ही कारवाई करण्यात आली असून, चोरून नेलेली संपूर्ण रक्कम पोलिसांनी आरोपींकडून हस्तगत करण्यात आली आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, शेख कलीम शेख इसाक (वय ५०, रा. यावल) हे १ डिसेंबर २०२५ रोजी पत्नीच्या औषधोपचारासाठी जळगावातील रुग्णालयात आले होते. औषधे घेऊन घरी जाण्यासाठी ते जळगाव शहरातील अजिंठा चौफुली येथून बसमध्ये चढत होते. याच संधीचा फायदा घेत त्यांच्या पाठीमागून आलेल्या अनोळखी व्यक्तीने त्यांच्या पॅन्टच्या खिशातील १५ हजार रुपये रोख रक्कम हातचलाखीने काढून घेतली. हा प्रकार लक्षात येताच शेख कलीम यांच्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.

गुन्हा दाखल होताच पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांनी तातडीने एमआयडीसी पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाला आरोपींचा शोध घेण्याचे निर्देश दिले. त्यानुसार, पथकातील अंमलदारांनी अत्यंत गोपनीय पद्धतीने तपास सुरू केला. त्यांनी घटनास्थळाजवळील सीसीटीव्ही फुटेजचे बारकाईने निरीक्षण केले आणि गुप्त माहितीच्या आधारे आरोपींची ओळख पटवली. या तपासात, हमीद अय्युब खान (वय २२, रा. अक्सा नगर, जळगाव), समीर खान अफसर खान (वय २२, रा. शेरा चौक, जळगाव) आणि शोहेब मेहमुद पटेल (वय २३, रा. शेरा चौक, रजा कॉलनी, जळगाव) अशा तीन तरुणांची नावे निष्पन्न झाली. पोलिसांनी तातडीने सापळा रचून या तिघांनाही अटक केली. अटक केलेल्या आरोपींकडून पोलिसांनी फिर्यादींच्या पॅन्टच्या खिशातून चोरलेली संपूर्ण १५ हजार रुपये रोख रक्कम हस्तगत केली आहे.

मा. पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही यशस्वी कारवाई पोलीस उपनिरीक्षक राहुल तायडे, चंद्रकांत धनके, सहाय्यक फौजदार विजयसिंग पाटील, पोहेकॉ किरण पाटील, पोहेकॉ गिरीष पाटील, पोना प्रदीप चौधरी आणि पोकॉ विशाल कोळी यांनी पार पाडली. पुढील तपास पोहेकॉ गिरीष पाटील हे करीत आहेत. या कारवाईमुळे जळगाव शहरातील पाकिटमारांच्या टोळीला मोठा दणका बसला आहे.