
जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहराच्या शाहूनगर भागातील रस्त्यांची दुर्दशा आणि जळगाव महानगरपालिकेच्या प्रशासकीय दुर्लक्षाविरोधात संतप्त नागरिकांनी आज मंगळवारी मनपा कार्यालयात धडक देत प्रशासनाला निवेदन सादर केले. अमृत योजनेच्या कामांसाठी रस्ते खोदल्यानंतर ते पूर्ववत न केल्याने संपूर्ण परिसर खड्डेमय झाला असून, लहान मुले आणि वृद्ध व्यक्तींना अपघातांना सामोरे जावे लागत असल्याचा गंभीर आरोप नागरिकांनी केला आहे.

जळगाव शहरातील शाहूनगरमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून रस्त्यांची अवस्था बिकट आहे. त्यातच, जळगाव महापालिकेच्या माध्यमातून शहरात अमृत योजनेची कामे हाती घेण्यात आली. या कामांदरम्यान शाहूनगरातील मुख्य रस्त्यांवर ठिकठिकाणी मोठे खड्डे खोदण्यात आले. मात्र, हे काम पूर्ण झाल्यानंतर ठेकेदाराने किंवा मनपा प्रशासनाने या खड्ड्यांची कोणत्याही प्रकारची दुरुस्ती केली नाही.
यामुळे रस्ते पूर्णपणे उखडले असून, सध्या या रस्त्यांवरून जाणे म्हणजे ‘अपघाताला आमंत्रण’ देण्यासारखे झाले आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिक आणि शाळेत जाणारी मुले या खड्ड्यांमुळे पडत असून, त्यांच्यासोबत अपघात घडत असल्याच्या अनेक तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत.
रस्त्याच्या दुरुस्तीसाठी यापूर्वीही अनेकदा मनपा प्रशासनाला निवेदन देण्यात आले होते. परंतु, प्रशासनाने या गंभीर समस्येकडे साफ दुर्लक्ष केले असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी यावेळी केला. प्रशासनाच्या या उदासीन भूमिकेमुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी आज एकत्र येऊन मनपाला घेराव घातला.
या निवेदनाद्वारे शाहूनगर येथील नागरिकांनी मनपा प्रशासनाला तातडीने रस्ता दुरुस्त करण्याची मागणी केली आहे. “रस्त्याचे काम त्वरित पूर्ण न झाल्यास आम्ही शांत बसणार नाही,” असा स्पष्ट इशाराही नागरिकांनी दिला आहे. “मागणी मान्य न झाल्यास भविष्यात मनपा कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल,” असे नागरिकांनी निवेदनाच्या माध्यमातून स्पष्ट केले आहे.



