Home Cities जळगाव मनसेकडून प्रभाग १८/१९ मधील दुर्लक्षित समस्यांवर तत्काळ उपाययोजना करण्याची मागणी

मनसेकडून प्रभाग १८/१९ मधील दुर्लक्षित समस्यांवर तत्काळ उपाययोजना करण्याची मागणी


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील प्रभाग क्रमांक १८/१९ मध्ये अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मूलभूत सुविधांच्या समस्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे. उपमहानगराध्यक्ष श्रीकृष्ण मेंगडे आणि ललित शर्मा यांच्या नेतृत्वाखाली मनसे कार्यकर्त्यांनी परिसरातील रस्ते, गटारे, साफसफाई आणि पथदिवे यांसंदर्भात प्रशासनाचे लक्ष वेधले. स्थानिक नागरिकांच्या दैनंदिन अडचणींचा पाढा वाचत या समस्यांवर तत्काळ उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली.

प्रभागातील नितीन साहित्य नगर, अमित कॉलनी, कृष्णा नगर आणि इतर भागांमध्ये गेल्या पंधरा वर्षांत कोणत्याही रस्त्याचे, गटारीचे किंवा विकासकामाचे पाऊल उचलले गेले नाही, अशी तक्रार नागरिकांनी व्यक्त केली. मागील महिन्यापर्यंत हा भाग प्रभाग क्रमांक १८ मध्ये होता; नवीन रचनेनुसार तो प्रभाग १९ मध्ये समाविष्ट झाला आहे. सत्तेत असलेल्या नगरसेवकांनी या मूलभूत गरजांकडे दुर्लक्ष केले, असा आरोप मनसेने केला.

मनसे उपमहानगराध्यक्ष श्रीकृष्ण मेंगडे यांनी १८ महिन्यांपूर्वी महानगरपालिकेकडे पथदिवे बसविणे आणि कचरा संकलन सुधारण्यासाठी मागणी केली होती. त्यानंतर महानगरपालिकेने ही मागणी मान्य करून काही प्रमाणात सोयी उपलब्ध करून दिल्या होत्या. मात्र, दीर्घकाळ निवडून आलेल्या नगरसेवकांनी याकडे कधीच लक्ष दिले नव्हते, हे दुर्दैवी असल्याचे मेंगडे यांनी सांगितले. नगरसेवक नसतानाही मनसेने आंदोलन आणि निवेदनाद्वारे कामे करून घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

आज मनसेच्यावतीने पुन्हा एकदा प्रभागातील सखोल पाहणी करण्यात आली. सुप्रीम कॉलनी, अमित कॉलनी, कृष्णा नगर, पोलीस कॉलनीचे काही भाग, खूबचंद नगर, रामदेव बाबा मंदिर मार्ग, सुप्रीम कॉलनी स्टॉप ते सागर अपार्टमेंट या भागांत रस्ते कच्चेच राहिल्याचे स्पष्ट झाले. २०१७ पासून सागर अपार्टमेंट ते कृष्णानगर पाटीपर्यंतच्या रस्त्यावर खडीसुध्दा टाकण्यात आलेली नाही, अशी स्थिती मनसे कार्यकर्त्यांनी निदर्शनास आणली.

गटारी आणि साफसफाईबाबत श्रीकृष्ण मेंगडे यांनी आरोग्य अधिकारी उदय पाटील यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी सोमवारपर्यंत विशेष मोहीम राबवून कामे सुरू करण्याचे आश्वासन दिले. प्रशासनाला आता तरी जाग येईल का, असा प्रश्न मनसेने उपस्थित केला आहे.

या पाहणीत उपमहानगराध्यक्ष श्रीकृष्ण मेंगडे, उपमहानगराध्यक्ष ललित शर्मा, शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील, विभागाध्यक्ष उमेश अठरे, जनहितचे तालुका उपाध्यक्ष विकास पात्रे, निलेश पाटील, साईनाथ भुरीवर, कल्पना कोळी तसेच परिसरातील महिला रहिवासी आणि मनसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Protected Content

Play sound