जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव महापालिकेच्या मतदार यादीत तब्बल ३३ हजार दुबार मतदारांची नावे आढळल्याने प्रशासन सतर्क झाले असून, निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार या मतदारांची स्वतंत्र चौकशी करून त्यांच्याकडून हमीपत्र घेण्याची मोहीम ८ डिसेंबरपासून सुरू केली जाणार आहे. अनेक मतदारांची नावे दोन ते तीन वेळा नोंदली गेल्याचे निदर्शनास आले असून, मतदान कोणत्या प्रभागात करायचे याबाबत स्पष्ट माहिती घेणे आवश्यक ठरले आहे.

निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनानुसार महापालिकेने प्रसिद्ध केलेल्या प्रारूप मतदार यादीत दुबार नावे असलेल्या मतदारांच्या नावापुढे विशेष चिन्हांकन करण्यात आले होते. मात्र दुबार नोंदींची संख्या मोठी असल्याने याबाबत स्वतंत्र पडताळणी करण्याचे निर्देश आयोगाकडून प्राप्त झाले. यानुसार महापालिका प्रशासनाने विस्तृत मोहिम आखून घराघरात जाऊन या मतदारांशी थेट संपर्क साधण्याचे ठरविले आहे.

या मोहीमेअंतर्गत संबंधित मतदारांकडून कोणत्या प्रभागात मतदान करणार आहेत, याची लेखी हमी घेण्यात येणार आहे. यातून त्यांच्या नोंदींची नीट छाननी करून अंतिम मतदार यादी अचूक करण्याचा प्रयत्न महापालिका करत आहे. देण्यात आलेल्या माहितीनुसार शहरातील सुमारे १६ हजार मतदारांची नावे दोन ते तीन वेळा नोंदली असून, त्यामुळे निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता आणि अचूकता सुनिश्चित करण्यासाठी ही मोहीम अत्यावश्यक ठरली आहे.
मोहीम सुरळीतपणे पार पाडण्यासाठी एकूण १९ पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. यांचे नियंत्रण आणि संयोजन पाहण्यासाठी आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांनी आदेश काढून अतिरिक्त आयुक्त शोभा बाविस्कर, उपायुक्त धनश्री शिंदे, उपायुक्त निर्मला गायकवाड, सहायक संचालक नगररचना राजेश महाले आणि मुख्य लेखा परीक्षक विजयकुमार सोनवणे यांना निरीक्षणाची जबाबदारी दिली आहे. ही पथके शहरातील विविध प्रभागात जाऊन पडताळणीची प्रक्रिया हाती घेणार आहेत.
महापालिकेच्या निवडणूक शाखेने यादीतील त्रुटी सुधारण्यावर भर देत नागरिकांना सहकार्याचे आवाहन केले आहे. मतदार यादीतील अचूकता ही निवडणूक प्रक्रियेची पाया असून, दुबार नावे काढून टाकणे आणि योग्य नोंदी ठेवणे हा प्रशासनाचा प्राथमिक उद्देश असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.



