अमळनेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यात महसूल विभागात प्रतिज्ञापत्र (Affidavit) स्वीकारण्याची प्रक्रिया काही दिवसांपासून थांबवण्यात आल्याने नागरिकांचे दैनंदिन व्यवहार, शासकीय कामकाज आणि शैक्षणिक प्रक्रियेवर मोठा परिणाम झाला आहे. या वाढत्या गैरसोयीवर तातडीने उपाययोजना करण्यात याव्यात, या मागणीसाठी भाजपाचे विधानसभा क्षेत्रप्रमुख शितल देशमुख यांनी अमळनेर उपविभागीय प्रांताधिकाऱ्यांना लेखी निवेदन सादर केले.

निवेदनात नमूद केले आहे की जात, उत्पन्न, राहिवासी प्रमाणपत्रांसह नामांतरण, वारस नोंदणी आदी अनेक प्रक्रियांमध्ये प्रतिज्ञापत्र आवश्यक असते. मात्र तहसील कार्यालयात ही प्रक्रिया थांबवल्याने सर्वसामान्य नागरिकांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे. शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी, शासकीय कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी, विद्यार्थी आणि शेतकऱ्यांच्या कामांसाठी तसेच बँकिंग व्यवहारांसाठी प्रतिज्ञापत्र अत्यावश्यक असते. त्यामुळे ही सेवा बंद झाल्याने कामात अनावश्यक विलंब आणि प्रशासकीय अडथळे निर्माण होत असल्याचे देशमुख यांनी नमूद केले.

प्रतिज्ञापत्र स्वीकारले जात नसल्याने विद्यार्थ्यांचे शाळा–महाविद्यालयीन कामकाज अडकले असून शेतकऱ्यांना विविध शासकीय योजनांसाठी अर्ज करताना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. सरकार दरडोई सेवा उपलब्ध करून देण्यावर भर देत असतानाच महसूल विभागातील ही प्रक्रिया ठप्प झाल्याने जनतेमध्ये नाराजी वाढत असल्याचेही देशमुख यांनी नमूद केले.
प्रतिज्ञापत्र प्रक्रिया तातडीने पूर्ववत सुरु करावी, आवश्यक असल्यास नियमावलीसंबंधी स्पष्ट मार्गदर्शक सूचना नागरिकांना जाहीर कराव्यात आणि दैनंदिन कामकाजाला गती मिळण्यासाठी तातडीची कार्यवाही करावी, अशी ठाम मागणी निवेदनात करण्यात आली आहे. या संदर्भात सकारात्मक निर्णय घेऊन नागरिकांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा देशमुख यांनी व्यक्त केली.
निवेदन देताना माजी शहराध्यक्ष उमेश वाल्हे उपस्थित होते. या निवेदनाच्या प्रती राज्याचे मंत्री नामदार गिरीश महाजन, खासदार स्मिता उदय वाघ आणि आमदार अनिल भाईदास पाटील यांना देखील पाठविण्यात आल्या आहेत.



