Home धर्म-समाज पुढील महापरिनिर्वाण दिनी लोकार्पणाची तयारी : फडणवीसांचा विश्वास

पुढील महापरिनिर्वाण दिनी लोकार्पणाची तयारी : फडणवीसांचा विश्वास


मुंबई–लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा । डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदू मिल येथील भव्य आंतरराष्ट्रीय स्मारकाचे काम जलदगतीने पूर्णत्वाकडे जात असून, पुढील महापरिनिर्वाण दिनी या ऐतिहासिक स्मारकाचे लोकार्पण करण्यात येईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीवर अभिवादनासाठी आलेल्या लाखो भीम अनुयायांसोबत संवाद साधताना त्यांनी स्मारकाच्या प्रगतीचा आढावा सविस्तर मांडला.

फडणवीस यांनी सांगितले की इंदू मिल स्मारकाच्या तब्बल 50 टक्के कामाची पूर्तता झाली आहे. उर्वरित काम नियोजित पद्धतीने सुरळीत पार पडल्यास पुढील 6 डिसेंबरला म्हणजेच महापरिनिर्वाण दिनी स्मारकाचे लोकार्पण करता येईल. चैत्यभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बाबासाहेबांना अभिवादन करून भेट दिली. यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना पुतळा संघर्ष समितीच्या मागणीनुसार नव्या सरकारने समन्वय समिती स्थापन केल्याचे त्यांनी सांगितले.

स्मारकाच्या निर्मितीसाठी उभारण्यात येत असलेल्या शंभर फुटांच्या पायथ्यावर तब्बल 350 फूट उंच कांस्य पुतळा उभारला जाणार असून, हे सध्या प्रकल्पातील सर्वात मोठे आव्हान असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. पुतळ्याच्या पॅनेल कास्टिंगचे काम पूर्ण झाले असून, पायथा आणि आर्मेचर फॅब्रिकेशनची कामे सुरू आहेत. या प्रकल्पासाठी एकूण सहा हजार टन पोलादाची आवश्यकता असून त्यापैकी 1400 टन पोलाद आले आहे आणि 650 टनांचे फॅब्रिकेशन पूर्ण झाले आहे. पुतळ्याच्या दोन्ही बुटांचे पॅनेल कास्टिंग पूर्ण झाले असून, त्यावरील शिलाई आणि लेस अत्यंत सूक्ष्मतेने साकारल्याची माहितीही देण्यात आली.

स्मारक परिसरातील प्रवेशद्वार इमारत, संशोधन केंद्र, वाचनालय, प्रेक्षागृह आणि वाहनतळाची 100 टक्के स्ट्रक्चरल कामे पूर्ण झाली आहेत. अंतर्गत सजावट आणि बाह्य विकासाच्या कामांना वेग आला असून, वर्षभरात हे दिमाखदार स्मारक सर्वांसाठी खुले होईल, असे स्मारक समितीकडूनही सांगण्यात आले. पावसाळ्यापूर्वी पुतळ्याचा प्रमुख ढाचा उभारण्याचे नियोजन अंतिम टप्प्यात आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची आठवण करून देताना फडणवीस म्हणाले की, बाबासाहेबांनी विषमतेला शक्ती बनवून ज्ञान संपादन केले आणि समाजाला जागृत करून संविधान दिले. जातिधर्माचा विचार न करता देशाच्या सर्वसमावेशक विकासासाठी त्यांनी जगातील सर्वोत्तम संविधानाची निर्मिती केली. त्यांच्या दूरदृष्टीची उदाहरणे देताना फडणवीस यांनी सांगितले की, बाबासाहेबांनी वीजमंत्री म्हणून कार्यभार स्वीकारल्यावर राष्ट्रीय ग्रीडची संकल्पना राबवली; जी आजही अमेरिकेसारख्या प्रगत देशातही पूर्णपणे अस्तित्वात नाही. पंतप्रधान मोदी नेहमी म्हणतात तसे प्रत्येक प्रश्नाचे उत्तर भारतीय संविधानात आहे, असेही ते म्हणाले.


Protected Content

Play sound