अमळनेर लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील कळमसरे शिवारात शेतात येण्या-जाण्याच्या रस्त्याच्या किरकोळ कारणावरून एका महिलेला दोन जणांनी शिवीगाळ करत मारहाण केली आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याची गंभीर घटना गुरुवारी ४ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास घडली आहे. या घटनेप्रकरणी सायंकाळी ७ वाजता मारवड पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कळमसरे येथील रहिवासी शितल प्रदीप महाजन (वय ३४) या आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहेत. गुरुवारी ४ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजता दुपारी त्या शेतात काम करत असताना गहू पेरणीसाठी त्यांचे ट्रॅक्टर शेतात येत होते. त्यावेळी बाजूच्या शेतातील तुळशीराम त्र्यंबक महाजन आणि सरला तुळशीराम महाजन (दोघे रा. कळमसरे) या दोघांनी ट्रॅक्टर शेतातून जाऊ दिले नाही.

यावरून शितल महाजन आणि आरोपींमध्ये जोरदार शाब्दिक वाद सुरू झाला. वाद विकोपाला गेल्याने आरोपींनी शितल महाजन यांना शिवीगाळ केली. एवढेच नाही, तर तुळशीराम महाजन यांनी संतप्त होऊन शितल महाजन यांच्या डोक्यावर दगड मारून त्यांना दुखापत केली. “तुम्हाला जिवंत सोडणार नाही,” अशी धमकीही त्यांनी दिली. या घटनेनंतर शितल महाजन यांनी तातडीने मारवड पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार, तुळशीराम महाजन आणि सरला महाजन या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार संजय पाटील हे करीत आहेत.



