जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मुंबईच्या धकाधकीच्या जीवनातही आपली वारकरी परंपरा निष्ठापूर्वक जोपासणाऱ्या मंगेश नामदेव चौधरी (रा. आव्हाणे) यांचा पालकमंत्री गुलाबरावजी पाटील यांचे स्वीय सहाय्यक नवलसिंहराजे पाटील यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.

गोरेगाव येथील एका मोठ्या कंपनीत इंजिनिअर म्हणून कार्यरत असलेले मंगेश चौधरी हे कल्याणहून दादरच्या प्रवासात लोकल ट्रेनमध्ये आपल्या भजनी मंडळासह अभंग, भजन आणि गौळण म्हणतात. त्यांचे हे भक्तीपूर्ण रिल्स सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत, ज्यामुळे ते अल्पावधीतच प्रसिद्ध झाले आहेत.

वारकरी परंपरेचा हा अनमोल ठेवा जतन केल्याबद्दल मंगेश चौधरी यांचा शाल आणि मोमेंटो देऊन गौरव करण्यात आला. हा सत्कार वीर गुर्जर क्रिकेट लीग, चोपडा या आयोजन मंडळातील सदस्य म्हणून त्यांचा सहभाग लक्षात घेऊन करण्यात आला. यावेळी सत्कार सोहळ्याला वीर गुर्जर क्रिकेट लीग आयोजन समितीचे नचिकेत चौधरी, ‘लोकमत’चे उपसंपादक अजय पाटील, लाईम लाईट कॅफेचे संचालक माही जाधव आणि हिंदवी प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष महेश पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
मंगेश चौधरी यांनी आपल्या व्यस्त व्यावसायिक जीवनातही वारकरी सेवा जपून युवकांसाठी एक नवा आदर्श घालून दिला आहे. त्यांच्या या कार्यामुळे आव्हाणे गावाचे नाव सोशल मीडियाच्या माध्यमातून राज्यभर पोहोचले आहे.



