Home धर्म-समाज पाचोऱ्यात “माझी मुलगी माझा अभिमान” कार्यक्रम उद्या; प्रा. वसंत हंकारे यांचे मुलींच्या...

पाचोऱ्यात “माझी मुलगी माझा अभिमान” कार्यक्रम उद्या; प्रा. वसंत हंकारे यांचे मुलींच्या सक्षमीकरणावर मार्गदर्शन


पाचोरा – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । शहरात मुलींच्या सक्षमीकरणाला आणि पालकांमध्ये जागृती निर्माण करण्याला उद्देशून आयोजित करण्यात येत असलेला “माझी मुलगी माझा अभिमान” हा विशेष उपक्रम उद्या ६ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आला आहे. मुलींविषयी सकारात्मक दृष्टीकोन, सुरक्षा, प्रोत्साहन आणि सामाजिक बदलाच्या दिशेने वाटचाल घडवून आणणारा हा उपक्रम पालक, विद्यार्थीनी आणि नागरिकांसाठी अत्यंत महत्वाचा ठरणार आहे.

हा कार्यक्रम पाचोरा शहरातील गिरड रोडवर असलेल्या गो.से. हायस्कूल येथे सकाळी १० वाजता अखिल मराठा समाज सेवा प्रतिष्ठान संचलित मराठा महिला दामिनी संघाच्या पुढाकाराने आयोजित होत आहे. या उपक्रमासाठी महाराष्ट्रातील प्रसिद्ध आणि फायरब्रॅण्ड व्याख्याते म्हणून ओळखले जाणारे प्रा. वसंत हंकारे विशेष उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. मुलींच्या आत्मविश्वास वाढीसाठी, त्यांच्या निर्णयक्षमतेसाठी आणि समाजात त्यांची ओळख अधिक सक्षम करण्यासाठी हंकारे यांचे मार्गदर्शन प्रेरणादायी ठरणार आहे.

कार्यक्रमासाठी उपविभागीय पोलिस अधिकारी बापू रोहम, पाचोरा पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक राहुलकुमार पवार, पो.उ.नि. योगेश गणगे, पिंपळगाव हरेश्वर पोलिस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याणी वर्मा, गटशिक्षणाधिकारी विजय पवार आणि शिक्षण विस्तार अधिकारी समाधान पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. मुलींच्या सुरक्षेविषयी, शिक्षणाविषयी आणि हक्कांविषयी प्रशासनाची भूमिका आणि उपाययोजनांवरही या कार्यक्रमाद्वारे महत्त्वपूर्ण संदेश पोहोचणार आहेत.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अखिल मराठा समाज सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. योगेश पाटील, सचिव संजय पाटील, उपाध्यक्ष नितीन पाटील, कार्याध्यक्ष धनराज पाटील तसेच मराठा महिला दामिनी संघाच्या पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न केले असून पालक, शालेय तसेच महाविद्यालयीन विद्यार्थीनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.


Protected Content

Play sound