Home Cities अमळनेर निंब येथे श्री दत्त जयंती उत्सव उत्साहात साजरा; हजारो भाविकांच्या उपस्थितीने परिसर...

निंब येथे श्री दत्त जयंती उत्सव उत्साहात साजरा; हजारो भाविकांच्या उपस्थितीने परिसर भक्तिमय


अमळनेर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील निंब येथील श्री सद्गुरु पुण्यक्षेत्रम येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री दत्त जयंती उत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरा करण्यात आला. श्री अनिरुद्ध उपासना फाऊंडेशन तर्फे आयोजित या उत्सवाला जळगाव, धुळे, नंदुरबार, शिरपूर, मुंबईसह राज्याच्या विविध भागांतून हजारो भाविकांनी हजेरी लावली. तापी आणि पांझरा नदीच्या पवित्र संगमाजवळील परिसरात दिवसभर धार्मिक वातावरण दाटून राहिले.

उत्सवाची सुरुवात सकाळी ८ वाजता श्री दत्त कैवल्य यागाने झाली. यागाच्या वेळी उपस्थित भाविकांनी ध्यान, जप आणि प्रार्थनामध्ये स्वतःला अर्पण करत दत्त भक्तीचा अनुभव घेतला. त्यानंतर सकाळी १० वाजता श्री दत्तात्रेय उदी कुंभाची भव्य पालखी मिरवणूक मोठ्या उत्साहात निघाली. “दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा” या गजरात भक्त मंडळी तल्लीन होऊन सहभागी झाली. जळगाव, नंदुरबार, शिरपूर आणि अमळनेर येथील भक्तांचा खास सहभाग यावेळी पाहायला मिळाला.

सुमारे ११ वाजता पालखी मुख्य मंडपात दाखल झाली. त्यानंतर पूजनास प्रारंभ झाला. दुपारी १२ वाजता दत्त आरतीसोबत स्वामी समर्थ, साईनाथ आणि सद्गुरु श्री अनिरुद्ध यांच्या आरत्या झाल्या. प्रदक्षिणा व आरतीने संपूर्ण वातावरण अधिकाधिक आध्यात्मिक झाले.

उत्सवासाठी सुबक सजावट करण्यात आली होती. झेंडू फुलांनी मंडप सजविण्यात आला होता, तर गुढ्या, तोरणे आणि केळीचे खांब यामुळे परिसर अधिक पवित्र आणि प्रसन्न भासत होता. ग्रामीण भागातील आणि दूरदूरहून आलेल्या भाविकांसाठी योग्य नियोजन, शिस्तबद्ध व्यवस्थापन आणि पर्यावरणपूरक व्यवस्था या उत्सवाची वैशिष्ट्ये ठरली.

मार्गशीर्ष महिन्याच्या निमित्ताने येथे श्री वर्धमान व्रताधीराज उपासनेचे आयोजनही करण्यात आले आहे. दिवसभर गुरुगीता पठण, दर्शन आणि आरतीमध्ये सहभागी झालेल्या भाविकांनी आपल्या आध्यात्मिक भावनांना नवसंजीवनी दिली. भक्तिमय वातावरणात दत्त जयंती उत्सव संपन्न झाला.


Protected Content

Play sound