पुणे-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज, वृत्तसेवा । महाराष्ट्रात पुन्हा एकदा कडाक्याच्या थंडीची चाहूल लागली असून ३ डिसेंबरपासून तापमानात लक्षणीय घट होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. उत्तर आणि मध्य महाराष्ट्रासह राज्यातील अनेक भागात थंडी वाढणार असून काही ठिकाणी थंडीची लाटही येऊ शकते, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.

हवामान खात्याने रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, मुंबई, ठाणे आणि पालघर या कोकण पट्ट्यात पुढील काही दिवस कोरडे हवामान राहील, असे सांगितले आहे. किनारपट्टी भागात वाऱ्याचा वेग कमी राहणार असून दिवसाचे तापमान साधारण पातळीवरच असल्याचा अंदाज वर्तवला आहे. मात्र, रात्रीच्या वेळी किंचित थंडीची जाणीव राहणार आहे.

धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहमदनगर, पुणे आणि घाट क्षेत्रांसाठी हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केला आहे. या जिल्ह्यांमध्ये तापमान अचानक घसरू शकते, ज्यामुळे सकाळी व रात्री लक्षणीय थंडी पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूरमध्येही थंडीचा जोर वाढू शकतो, म्हणून प्रशासनाने सावधगिरी बाळगण्याचे निर्देश दिले आहेत.
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांमध्ये तापमानात लक्षणीय घट होणार आहे. कोरडे हवामान आणि रात्रीची गारवा वाढण्यामुळे या भागात थंडी अधिक जाणवेल, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.
विदर्भातही तापमानाचा रेकॉर्ड खाली जाण्याची शक्यता असून नागपूरमध्ये थंडीची लाट येण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. नागपूर, अमरावती, अकोला, बुलढाणा, वर्धा, यवतमाळ, गडचिरोली आणि चंद्रपूर येथे रात्रीचे तापमान मोठ्या प्रमाणात घसरणार असून सकाळी गारठा जाणवण्याचा अंदाज आहे. नागपूरमध्ये विशेषतः पहाटे आणि रात्री तीव्र थंडीची अनुभूती होऊ शकते.
हवामान विभागाने संपूर्ण राज्यात पुढील काही दिवस थंडी कायम राहण्याची शक्यता व्यक्त केली आहे. त्यामुळे उबदार कपड्यांचा वापर करणे, रात्रीच्या वेळी बाहेर पडताना काळजी घेणे आणि लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांची विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन तज्ज्ञांनी केले आहे.



