
रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । रावेर शहर आणि परिसरात महिलांना लक्ष्य करून सोनसाखळी चोरीचे गुन्हे करणाऱ्या दोन सराईत चोरट्यांना रावेर गुन्हे शोध पथकाने मोठ्या शिताफीने अटक केली आहे. या कारवाईमुळे केवळ १ डिसेंबर रोजी रावेर येथे घडलेला गुन्हाच नव्हे, तर कुऱ्हा-काकोडा येथील जुना गुन्हाही उघडकीस आला असून, पोलिसांनी सुमारे अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

घडलेला प्रकार असा की, १ डिसेंबर २०२५ रोजी रावेर येथील शोभाबाई सुरेश पाटील (वय ४७, रा. वाघोड) या कर्जोत फाट्यावरून पायी घरी जात होत्या. याच वेळी लाल-काळ्या रंगाच्या बजाज पल्सर दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात इसमांनी त्यांच्याजवळ थांबून पत्ता विचारला आणि संधी साधून त्यांच्या तोंडावर माती फेकली. महिलेला गोंधळात पाडून आरोपींनी त्यांच्या गळ्यातील सुमारे १० ग्रॅम वजनाची सोन्याची पोत बळजबरीने तोडून घेऊन पोबारा केला होता.
तांत्रिक माहितीद्वारे दोघांची पटली ओळख
या घटनेचे गांभीर्य लक्षात घेत, रावेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांनी तातडीने गुन्हे शोध पथकाला तपास सुरू करण्याचे निर्देश दिले. पथकाने घटनास्थळासह परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. फुटेजमध्ये आरोपींचे चेहरे अस्पष्ट असले तरी, त्यांनी रावेर शहरात रेकी केल्यानंतर वाघोडच्या दिशेने प्रवास केल्याचा आणि त्यांच्या वाहनाचा तसेच शरीरयष्टीचा सुगावा लागला. तांत्रिक माहिती आणि गुप्तचर यंत्रणेच्या आधारे आरोपी अजय गजानन बेलदार (वय २०) आणि नरेंद्र उर्फ निलेश अशोक बेलदार (वय २०, दोघे रा. अंतुर्ली, ता. मुक्ताईनगर) यांची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आले.
पोलीसांकडून चोरट्यांचा पाठलाग
पोलीस पथक आरोपींच्या अंतुर्ली गावापर्यंत पोहोचले, परंतु आरोपी फरार झाल्याचे समजले. मात्र, डॉ. जयस्वाल यांच्या सूचनेनुसार पथकाने तिथेच शेतात तळ ठोकला. काही तासांच्या अथक प्रयत्नानंतर आरोपी गावात परतल्याची माहिती मिळताच, पोलिसांनी पाठलाग करून त्यांना नरवेल रोडवर पकडले. तपासात आरोपींनी कुऱ्हा-काकोडा (ता. मुक्ताईनगर) बस थांब्याजवळ ३ नोव्हेंबर रोजी केलेली १० ग्रॅम सोनसाखळी चोरीची कबुली दिली. पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेली ७५ हजार रुपये किमतीची पल्सर दुचाकी आणि १ लाख ७५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिन्यांसह एकूण अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
यांनी केली यशस्वी कामगिरी
हा संपूर्ण तपास पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी आणि अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. डॉ. विशाल जयस्वाल, पो.उप.नि. तुषार पाटील, तसेच गुन्हे शोध पथकातील कल्पेश आगोदकर, विशाल पाटील, प्रमोद पाटील, सुकेश तडवी, विकार शेख, भुषण सपकाळे आणि सायबर सेलचे मिलिंद जाधव व गौरव पाटील यांनी यशस्वीपणे पार पाडला. आरोपींना न्यायालयात हजर करून दोन दिवसांची पोलीस कोठडी घेण्यात आली असून, पुढील तपास पो.उप. निरीक्षक तुषार पाटील करीत आहेत.



