Home Cities अमळनेर अमळगाव सोसायटीचा नवीन कारनामा ! शेतकऱ्यांकडून शंभराची उकळणी ; तोंडी आदेशाचा आधार...

अमळगाव सोसायटीचा नवीन कारनामा ! शेतकऱ्यांकडून शंभराची उकळणी ; तोंडी आदेशाचा आधार कुठला?


अमळनेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । अमळगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीकडून शेतकऱ्यांकडून होत असलेल्या नवीन उकळणीचा प्रकार पुन्हा एकदा समोर आला आहे. कागदपत्रांच्या नावाखाली प्रत्यक्षात कोणत्याही लेखी आदेशाविना शेतकऱ्यांकडून १०० रुपयांची आकारणी करण्यात येत असल्याने शेतकरी वर्गात संतापाची लाट उसळली आहे. शासनाच्या नियमांना आणि प्रक्रियांना बगल देत अशाप्रकारे पैसे घेण्यामागे कोणतेही वैध आधार नसल्याचा आरोप होत आहे.

अमळनेर तालुक्यातील अमळगाव सोसायटीत सातबारा उतारा, आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक पासबुक यांच्या झेरॉक्सच्या नावाखाली प्रत्येक शेतकऱ्याकडून १०० रुपये घेण्यास भाग पाडले जात असल्याचे उघड झाले आहे. हा निर्णय वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेवर आधारित असल्याचा दावा सोसायटीचे चेअरमन रावसाहेब पाटील करत असले तरी यासंदर्भात कोणतेही अधिकृत आदेश उपलब्ध नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

शेतकऱ्यांचा आरोप आहे की सोसायटीकडून त्यांना कोणतीच ठोस सुविधा मिळत नसताना सतत नवीन निमित्ते काढून आर्थिक बोजा टाकला जात आहे. यापूर्वीही याच सोसायटीने किसान क्रेडिट कार्डसाठी बेकायदेशीर शुल्काची उकळणी केली होती. शासनाने मोफत उपलब्ध करून देण्याच्या स्पष्ट आदेशानंतरही सोसायटीने शेतकऱ्यांच्या खिशावर डाका टाकल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा अनधिकृत वसुलीचा प्रकार समोर आला आहे.

राज्य सरकारकडून सुरू असलेल्या कर्जमाफी प्रक्रियेच्या अनुषंगाने शेतकऱ्यांकडून कागदपत्रे मागवली जात आहेत. मात्र त्यासाठी शंभर रुपये आकारणी करण्याचे आदेश कोणत्या नियमांनुसार आहेत, कोणत्या परिपत्रकात नमूद आहेत, याबद्दल सोसायटीकडे कोणतेही लेखी स्पष्टीकरण नसल्याचे शेतकरी सांगत आहेत. तोंडी आदेशाचा आधार घेऊन सुरू असलेली ही वसुली सरळसरळ लुटारूपण असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून होत आहे.

या घटनेमुळे शेतकरी वर्गात संताप उसळला असून त्यांनी सोसायटीकडून घेतल्या जाणाऱ्या या शुल्काविरोधात आवाज उठवला आहे. तोंडी आदेशाने पैसे घेण्याचा अधिकार सोसायटीला कोणी दिला, याबाबतही त्यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. संपूर्ण प्रकारावर प्रशासनाने तातडीने चौकशी करून जबाबदारांवर कारवाई करावी, अशा मागण्या सर्वत्र सुरू आहेत.

दरम्यान, या प्रकरणावर अमळनेर तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे. “प्रति शेतकरी शंभर रुपये घेण्याबाबत आम्ही कोणतेही आदेश कोणत्याही सोसायटीला दिलेले नाहीत. अशा प्रकार जर कुठे उघड झाला तर कायदेशीर कारवाई केली जाईल,” असे त्यांनी सांगितले. यामुळे सोसायटीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


Protected Content

Play sound