
यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । यावल नगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीत यंदा तिरंगी लढतीमुळे राजकीय वातावरण तापले असून निकालापूर्वीच विजयाचे दावे-प्रतिदावे जोरात सुरू झाले आहेत. भाजपा, महाविकास आघाडी आणि शिवसेना शिंदे गट अशा तीनही पक्षांमध्ये संघर्ष रंगला असला तरी खरी झुंज भाजपा आणि महाविकास आघाडी यांच्यात झाल्याचे स्थानिक राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे.

नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत अधिकृत भाजप उमेदवार रोहिणी उमाकांत फेगडे आणि महाविकास आघाडीतील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या उमेदवार छाया अतुल पाटील यांच्यात चुरशीची लढत झाल्याचे मानले जात आहे. तीन पक्षांचा तिढा असला तरी प्रत्यक्ष सरळ सामना या दोघींमध्ये झाला असल्याचे स्थानिकांमध्ये चर्चिले जात आहे.
भारतीय जनता पक्षाकडून नगराध्यक्षपद आणि १३ नगरसेवकांच्या विजयाचा दावा जोरदार पद्धतीने करण्यात आला आहे. भाजप उमेदवार रोहिणी फेगडे यांचे पती उमाकांत फेगडे यांनी पक्षाची संघटनात्मक ताकद, विकासकार्यातील विश्वास आणि जनतेचा प्रतिसाद पाहता पालिकेवर भगवा फडकणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीनेही विजयाबाबत तितकाच आत्मविश्वास दाखवला आहे. छाया पाटील यांचे पती तसेच माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांनी प्रचंड बहुमताने विजय मिळेल आणि पालिकेत आघाडीचे बहुमत राहील असा विश्वास व्यक्त केला आहे. दोन्ही गटांचे दावे जोरात असले तरी अंतिम सत्य मतमोजणीमध्येच स्पष्ट होणार आहे.
दरम्यान, मतमोजणीपूर्वी सुरक्षेची कडक तयारी करण्यात आली आहे. यावल तहसील कार्यालयात स्ट्रॉंग रूम तयार करण्यात आली असून मतदान यंत्रे सुरक्षितरित्या तेथे ठेवण्यात आली आहेत. स्ट्रॉंग रूम तसेच मुख्य प्रवेशद्वारावर राज्य राखीव पोलीस दलाचा २४ तास पहारा ठेवण्यात आला आहे. राज्य राखीव दलाचे ११ शिपाई, एक हवालदार तसेच जिल्हा पोलीस दलाचा अतिरिक्त बंदोबस्त तैनात आहे. संपूर्ण तहसील कार्यालय परिसर बंदिस्त ठेवण्यात आला असून पोलिसांकडून सतत गस्त चालू आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांनी दिली.
निवडणुकीचे राजकीय तापमान दिवसेंदिवस वाढत असून निकालासाठी सर्वांचे डोळे स्ट्रॉंग रूमकडे लागले आहेत. मतमोजणीपूर्वी दोन्ही बाजूंचे आत्मविश्वासपूर्ण दावे आणि जोरदार टोलामोळीमुळे यंदाची निवडणूक अधिकच चुरशीची ठरत आहे.



