Home क्राईम भीषण अपघात : ट्रक-आयशरच्या धडकेत परप्रांतीय चालकाचा जागीच मृत्यू!

भीषण अपघात : ट्रक-आयशरच्या धडकेत परप्रांतीय चालकाचा जागीच मृत्यू!


धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव तालुक्यातील भोकणी गावाजवळून गेलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वर २२ नोव्हेंबर रोजी झालेल्या एका भीषण अपघातात, परराज्यातील एका ट्रक चालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. कलकत्त्याहून गुजरातकडे जात असताना आयशर गाडीने पुढील ट्रकला मागून जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला. या घटनेप्रकरणी मंगळवारी (२ डिसेंबर) रात्री उशिरा धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टुपाय कालिपदा दास (वय २४, रा. बेलदा, पश्चिम बंगाल) असे या अपघातात मयत झालेल्या तरुण ट्रक चालकाचे नाव आहे.

या घटनेबाबत अधिक माहिती अशी की, २२ नोव्हेंबर रोजी पहाटे सव्वा पाच वाजेच्या सुमारास टुपाय दास हा आयशर गाडी (क्र. डब्ल्यूबी ३३ एफ २९६३) चालवत होता. भोकणी गावाजवळ महामार्गावर त्याचे वाहन जात असताना, अचानक त्याने रस्त्यावर पुढे असलेल्या एका ट्रकला (क्र. एमएच १८ बीजी ०५७३) मागून जोरदार धडक दिली. धडक इतकी जबरदस्त होती की, आयशरच्या केबिनचे मोठे नुकसान झाले आणि चालक टुपाय कालिपदा दास याचा जागीच दुर्दैवी अंत झाला. अपघातानंतर तातडीने मदतकार्य सुरू करण्यात आले, मात्र टुपाय दासला वाचवता आले नाही.

या घटनेनंतर टुपाय दासचा सहकारी विश्वजीत वासुदेव दास यांनी धरणगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार मंगळवारी, २ डिसेंबर रोजी मध्यरात्री १२.३० वाजता गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या अपघाताचा पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल अर्जुन कुवारे हे करीत आहेत.


Protected Content

Play sound