Home Cities जळगाव यावल व रावेर नगरपरिषद निवडणूक तयारीचा जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा

यावल व रावेर नगरपरिषद निवडणूक तयारीचा जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा

0
115


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यातील यावल आणि रावेर नगरपरिषदांच्या सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या तयारीला गती मिळत असताना जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी दोन्ही नगरपरिषद क्षेत्रांना भेट देत निवडणूक प्रक्रियेचा प्रत्यक्ष आढावा घेतला. निवडणूक शांततेत, पारदर्शकपणे आणि सुसूत्रपणे पार पडावी यासाठी सुरू असलेल्या कामकाजाची पाहणी त्यांनी केली.

जिल्हाधिकारी घुगे यांनी सर्वप्रथम यावल नगरपरिषद कार्यालयाला भेट देऊन निवडणुकीसंबंधी प्राथमिक तयारीची चौकशी केली. यावल तहसील कार्यालयातील स्ट्रॉंग रूमची त्यांनी विशेष पाहणी करत सुरक्षा व्यवस्था, इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांच्या साठवणुकीची पद्धत आणि निगराणी व्यवस्थेची माहिती घेतली. यावेळी तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांनी मतदान केंद्रांवरील सुविधांपासून ते मतदार जागृती उपक्रमांपर्यंत सर्व तपशीलवार माहिती जिल्हाधिकाऱ्यांना दिली. मतदारांना सुलभ, सुरक्षित व सुयोग्य वातावरण मिळावे यासाठी स्थानिक पातळीवर कोणती तयारी सुरू आहे, याचीही त्यांनी समीक्षा केली.

यानंतर जिल्हाधिका-यांनी रावेर नगरपरिषद निवडणूक प्रशिक्षण कार्यशाळेला भेट देऊन उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांना निवडणूक कामकाजाबाबत मार्गदर्शन केले. मतदान प्रक्रियेतील प्रत्येक टप्पा नीट समजून घेणे अत्यावश्यक असून मतदानाच्या दिवशी कोणती काळजी घ्यावी, अनपेक्षित परिस्थितीत कशाप्रकारे प्रतिसाद द्यावा यासंदर्भात त्यांनी सूचना दिल्या. शांततापूर्ण आणि निष्पक्ष निवडणूक पार पाडणे ही प्रशासनाची मोठी जबाबदारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मतदान प्रक्रियेत मतदारांना जर काही अडचणी आल्या तर अधिकाऱ्यांनी तातडीने मदत करावी आणि नागरिकांना मतदानासाठी प्रोत्साहन मिळावे यासाठी व्यापक जनजागृती करावी, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. स्थानिक प्रशासनाने मतदार शिक्षणाची जबाबदारी प्रभावीपणे पार पाडल्यास मतदानाचा टक्का वाढण्यास मदत होईल, असेही त्यांनी नमूद केले. या दौऱ्यादरम्यान रावेरचे तहसीलदार आणि निवडणूक निर्णय अधिकारी बंडू कापसे उपस्थित होते.


Protected Content

Play sound