
एरंडोल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहर प्रतिनिधी: नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ. नरेंद्र ठाकूर यांनी निवडणुकीच्या प्रचारात कॉर्नर सभांच्या माध्यमातून नागरिकांशी थेट ‘फेस टू फेस’ संपर्क साधण्यावर भर दिला आहे. बुधवारी रात्री उशिरा प्रभाग क्रमांक ९ मधील गढी खाली परिसरात त्यांनी अशीच एक प्रभावी कॉर्नर सभा घेतली.

या सभेत डॉ. नरेंद्र ठाकूर यांनी नागरिकांचे दैनंदिन प्रश्न शांतपणे ऐकून घेतले आणि निवडून आल्यास या प्रश्नांची उत्तरे तत्काळ मिळतील, असे ठोस आश्वासन दिले. “तुम्ही मला निवडून दिल्यास, शहराच्या विकासासाठी आणि तुमच्या समस्या सोडवण्यासाठी मी पूर्णपणे कटिबद्ध राहीन,” असे ते म्हणाले.
यावेळी माजी नगराध्यक्ष राजूबाबा चौधरी, किशोर भाऊ निंबाळकर, भैया भाऊ पाटील, गणेश माने, गोकुळ पाटील, आर. डी. पाटील आणि भाजपचे उपजिल्हाध्यक्ष एस. आर. पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
सभेमध्ये भाजपचे उपजिल्हाध्यक्ष एस. आर. पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सुशिक्षित आणि डॉक्टर उमेदवार नगराध्यक्षपदी निवडून आल्यास शहराचा विकास किती वेगाने होऊ शकतो, हे सोदाहरण समजावून सांगितले. “उच्चशिक्षित व्यक्ती नेतृत्व करत असल्यास, शहराच्या समस्यांवर वैज्ञानिक आणि कार्यक्षम पद्धतीने उपाययोजना होतात, ज्याचा थेट फायदा नागरिकांना मिळतो,” असे मत त्यांनी व्यक्त केले.
शहराचा जलद आणि सुनियोजित विकास साधण्यासाठी नागरिकांनी डॉ. नरेंद्र ठाकूर यांना भरघोस मतांनी निवडून द्यावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.



