वरणगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । वरणगाव नगरपरिषद निवडणुकीचे राजकीय वातावरण दिवसेंदिवस तापत असून, नगराध्यक्ष पदाच्या स्पर्धेला आता विशेष रंग चढू लागला आहे. भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार शामलताई झांबरे यांच्या प्रचाराचा शुभारंभ बुधवारी सकाळी उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आला. शहरातील प्रमुख चौकातून फटाक्यांच्या आतषबाजीसह भव्य प्रचार रॅलीला सुरुवात झाली. ढोल-ताशांच्या गजरात निघालेल्या या रॅलीमुळे परिसरात निवडणूक जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले.
या रॅलीत विशेष म्हणजे महिला मतदार आणि कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती पाहायला मिळाली. विविध प्रभागांमधून रॅली जात असताना नागरिकांनी शामलताई झांबरे यांचे पारंपरिक पद्धतीने औक्षण करून स्वागत केले. यावेळी अनेक ठिकाणी फुले उधळून आणि घोषणाबाजी करत समर्थकांनी भाजप उमेदवारांना पाठिंबा दर्शविला.

शहरातील ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधत शामलताई यांनी त्यांच्या आशीर्वादाचा लाभ घेतला. नगरपरिषदेसाठी विकास, पाणीपुरवठा, स्वच्छता, महिलांसाठी सुविधा आणि नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांचे निराकरण हे प्राधान्याने काम करण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी व्यक्त केले. आगामी निवडणुकीत मतदारांनी भाजपला साथ देऊन वरणगावच्या प्रगतीचा मार्ग प्रशस्त करावा, असे आवाहन त्यांनी समर्थकांशी बोलताना केले.
दरम्यान, भाजपचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि अनेक तरुण स्वयंसेवक रॅलीत सहभागी झाले होते. शहरातील विविध भागांतून रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याने निवडणुकीत उत्सुकता अधिक वाढली आहे.



