Home Cities जळगाव मतदार याद्यांतील गोंधळ दूर केल्याशिवाय मनपा निवडणुका घेऊ नयेत : राष्ट्रवादी (शरद...

मतदार याद्यांतील गोंधळ दूर केल्याशिवाय मनपा निवडणुका घेऊ नयेत : राष्ट्रवादी (शरद पवार गट)ची मागणी

0
112

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव महानगरपालिकेच्या 2026 च्या सार्वत्रिक निवडणुका जवळ आल्या असून मनपा प्रशासनाने निवडणूक तयारीला गती दिली आहे. मात्र, या संपूर्ण प्रक्रियेत सुरूवातीपासूनच प्रभाग रचना, आरक्षण सोडत आणि आता मतदार याद्यांमध्ये झालेला गोंधळ यामुळे मोठ्या प्रमाणात गैरव्यवस्थापन दिसून येत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने केला आहे. याच पार्श्वभूमीवर पक्षाच्या शिष्टमंडळाने मनपा आयुक्त तसेच निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना निवेदन देत मतदार याद्या दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेऊ नयेत, अशी मागणी केली.

राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने दिलेल्या निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे की प्रारूप प्रभाग रचना जाहीर झाल्यापासूनच मनपा प्रशासनाकडून मोठा गोंधळ सुरू आहे. दोन महिन्यांपूर्वी जाहीर केलेल्या प्रभाग रचनेवर नागरिक आणि अनेक इच्छुक उमेदवारांनी मोठ्या प्रमाणात हरकती दाखल केल्या. मात्र, मनपाने त्या हरकती गांभीर्याने घेतल्या नाहीत. इतर मागासवर्गीय आरक्षणाच्या अंमलबजावणीत मनपा प्रशासन अपयशी ठरल्याने राज्य निवडणूक आयोगाकडून फटकारल्यानंतर काही ठिकाणचे आरक्षण बदलावे लागले, हा देखील मनपाच्या दुर्लक्षाचा ठळक पुरावा असल्याचा आरोप करण्यात आला.

प्ररूप मतदार याद्या 20 नोव्हेंबर 2025 रोजी प्रकाशित करण्यात आल्या, मात्र त्यातही प्रचंड गोंधळ दिसून आला. सुमारे 5 हजार ते 6 हजार तक्रारी नागरिकांनी नोंदवल्या आहेत. अनेक प्रभागांमध्ये 2 ते 3 हजार नावे दुबार आढळली असून काही नावे दोन ते तीन प्रभागांमध्ये एकाचवेळी दिसत आहेत. याशिवाय 15 ते 20 वर्षांपूर्वी स्थलांतरित झालेल्या नागरिकांची नावे, तसेच मृत व्यक्तींची नावे याद्यांमध्ये कायम असल्याचे नमूद करण्यात आले. निवेदनात आरोप करण्यात आला की सत्ताधारी पक्षातील इच्छुक उमेदवारांना सोयीचे पडावे म्हणून प्रभाग रचना, आरक्षण आणि आता मतदार याद्यांमध्ये जाणीवपूर्वक गोंधळ करण्यात आल्याचा आमचा ठाम विश्वास आहे.

मतदार याद्यांमधील दुबार नावे, मृत मतदारांची नावे, इतर विधानसभा मतदारसंघातील नावे आणि चुकीने जोडलेल्या प्रभागांतील नावे कमी करण्याचा अधिकार मनपा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे असून तो तत्काळ वापरला जावा, अशी मागणी करण्यात आली. तसेच नागरिकांना हरकती सादर करण्यासाठी आठ दिवसांचा अतिरिक्त कालावधी द्यावा, असे पक्षाने स्पष्टपणे नमूद केले.

निवडणुकांपूर्वी मतदार याद्या अचूक करणे आवश्यक असून त्याअगोदर निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली तर ती लोकशाही प्रक्रियेची थट्टा ठरेल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने दिला. अन्यथा पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असेही निवेदनात नमूद केले.

निवेदन देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे महानगर अध्यक्ष इजाज मलिक, माजी अध्यक्ष अशोक लाडवंजारी, महिला अध्यक्ष मंगला पाटील, कार्याध्यक्ष संग्रामसिंह सूर्यवंशी, युवक अध्यक्ष रिकू चौधरी, माजी नगरसेवक सुनील माळी, राजू मोरे, मजहर पठाण, डॉ. रिजवान खाटीक, गौरव वाणी, कलाबाई शिरसाट, रहीम तडवी, आकाश हिवाळे, गणेश पाटील, गौरव डांगे, कैलास पाटील तसेच इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


Protected Content

Play sound