Home प्रशासन हत्येच्या निषेधार्थ मुक्ताईनगरात कडकडीत बंद

हत्येच्या निषेधार्थ मुक्ताईनगरात कडकडीत बंद

0
162

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । मुक्ताईनगर शहरात काल घडलेल्या धक्कादायक हत्याकांडाने परिसरात संतापाची लाट उसळली असून, आरोपींना तत्काळ फाशी देण्याच्या मागणीसाठी आज शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. नागरिक, व्यापारी, सामाजिक संघटना आणि युवकांनी स्वयंस्फूर्तीने सहभागी होत मृतकाला न्याय मिळावा, या मागणीला दृढ पाठिंबा दिला.

कालच्या हत्येच्या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. सामाजिक माध्यमांसह स्थानिक पातळीवरही या प्रकरणाबाबत संताप व्यक्त होत होता. त्याच पार्श्वभूमीवर आज सकाळी युवकांनी व मित्रमंडळींनी दिलेल्या ‘मुक्ताईनगर बंद’च्या आवाहनाला प्रचंड प्रतिसाद मिळाला. शहरातील मुख्य बाजारपेठ, व्यावसायिक गल्ली-बोळ, किराणा दुकाने, कपड्यांचे व्यापार, छोट्या मोठ्या उद्योगांनी स्वयंस्फूर्तीने shutters खाली केले.

सकाळपासूनच शहरातील व्यवहार ठप्प दिसत होते. सार्वजनिक वाहतूकही मर्यादित स्वरूपात होती. बस, ऑटो यांचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी झाले होते. रस्त्यांवर शांतता पसरली होती; मात्र नागरिकांच्या डोळ्यांत संताप स्पष्ट दिसत होता. दिवसभर कोणताही अनुचित प्रकार घडू न देता बंद शांततेत पार पडला. स्थानिक सामाजिक संघटनांनी देखील या निषेधाला पाठिंबा दर्शवून मृतकाला न्याय मिळावा यासाठी प्रशासनाने कठोर निर्णय घ्यावा, अशी एकमुखी मागणी नोंदवली.

पोलीस प्रशासनाने शहरात सतर्कता वाढवत अतिरिक्त बंदोबस्त ठेवला होता. हत्येप्रकरणी आरोपींना आज न्यायालयात हजर केले जाणार आहे. पुढील कारवाई काय होते, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. नागरिकांच्या भावनांचा उद्रेक पाहता प्रशासनावर तातडीने आणि कठोर पावले उचलण्याचा दबाव वाढलेला दिसतो.


Protected Content

Play sound