Home क्राईम दिल्ली बॉम्बस्फोटातील डॉ. उमरचे तुर्की–सीरिया कनेक्शन उघड; एनआयएच्या तपासात धक्कादायक माहिती

दिल्ली बॉम्बस्फोटातील डॉ. उमरचे तुर्की–सीरिया कनेक्शन उघड; एनआयएच्या तपासात धक्कादायक माहिती


दिल्ली-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । लाल किल्ला परिसरात 10 नोव्हेंबर रोजी झालेल्या बॉम्बस्फोटानंतर देशभरात निर्माण झालेल्या भीतीच्या वातावरणात, एनआयएच्या तपासाने आता धक्कादायक व आंतरराष्ट्रीय स्तरावरील दहशतवादी कट उघडकीस आणला आहे. स्फोटाची सूत्रे थेट तुर्की, सीरिया आणि पाकिस्तानपर्यंत जोडली गेल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे, या संपूर्ण कटाचा केंद्रबिंदू एक डॉक्टर—डॉ. उमर—असल्याची माहिती समोर येत असून, दहशतवाद्यांनी वैद्यकीय व्यावसायिकांचा वापर करून मोठा घातपात घडवण्याचा प्रयत्न केल्याचे निष्पन्न झाले आहे.

पोलिस आणि एनआयएच्या सुत्रांनुसार, लाल किल्ल्याजवळ घाईगडबडीत झालेला स्फोट हा प्रत्यक्षात मोठ्या हल्ल्याची पूर्वतयारी होती. जैश-ए-मोहम्मदने या ऑपरेशनसाठी तब्बल 20 लाख रुपये पाठवले होते. स्फोटाच्या वेळी डॉ. उमर ही स्फोटकांचा वापर झालेल्या गाडीतच होता. ही गाडी दिल्लीच्या रस्त्यांवर तब्बल 11 तास फिरत राहिली आणि काही काळ ती एका प्रसिद्ध विद्यापीठाच्या परिसरातही दिसली होती. त्यामुळे दहशतवादी मॉड्यूलच्या हालचालींबाबत यंत्रणा अधिक सतर्क झाली आहे.

एनआयएच्या तपासात सर्वात धक्कादायक बाब म्हणजे डॉ. उमरचे 2022 मधील तुर्कीतील हालचाली. तो तुर्कीमध्ये एका कुख्यात सीरियन दहशतवाद्याला भेटला होता. या भेटीत डॉ. मुझम्मिल शकील गनई आणि डॉ. मुझफ्फर रायदर यांचाही सहभाग होता. तिघेही त्यांच्या पाकिस्तानी हँडलर ‘उकाशा’च्या सांगण्यावरून एका सीरियन दहशतवाद्याला भेटले होते. गुरुवारी एनआयएने डॉ. मुझम्मिलसह तीन आरोपींना अटक केली असून, त्यांच्या चौकशीमधून आंतरराष्ट्रीय दहशतवादी नेटवर्कची अनेक नवी पैलू समोर येत आहेत.

तपासात पुढे उघड झाले की, डॉ. उमर, डॉ. मुझफ्फर आणि डॉ. मुझम्मिल तुर्कीमध्ये तब्बल 20 दिवस राहिले होते. या कालावधीत ते पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमेवरील त्यांच्या हँडलर उकाशाशी संपर्कात होते. नंतर मुझफ्फर युएई मार्गे अफगाणिस्तानात पळून गेला आणि थेट अल-कायदामध्ये सहभागी झाला. दुसरीकडे, जैशकडून खास भारतात हल्ला घडवण्यासाठी डॉ. उमरला तुर्कीमधून परत पाठवण्यात आले.

भारतामध्ये परतल्यानंतर कोणालाही शंका न यावी म्हणून डॉ. उमरने अल-फलाह विद्यापीठात नोकरी स्वीकारली. ही नोकरी म्हणजे केवळ आवरण; प्रत्यक्षात तो अधिक लोकांना कटात सामील करण्याचे काम करत होता. त्याचदरम्यान मोठा हल्ला घडवण्यासाठी एक संपूर्ण मॉडेल तयार केले जात होते. या कटाच्या अनुषंगाने दिल्ली बॉम्बस्फोटासाठी वापरलेल्या i-20 कारची खरेदी अमीर रशीद अली आणि जसीर बिलाल वाणी यांनी केली होती. दोघांनाही या कटाची पूर्ण कल्पना होती आणि एनआयएने त्यांनाही ताब्यात घेतले आहे.

या सर्व घडामोडींमुळे दिल्लीतील बॉम्बस्फोट हा केवळ स्थानिक मॉड्यूलचा नसून, स्पष्टपणे आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनांचे हात असल्याचे उघड झाले आहे. तपास अधिक गतीने सुरू असून, आणखी काही महत्वाचे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


Protected Content

Play sound