जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । गोदावरी फाऊंडेशन्सच्या डॉ. उल्हास पाटील विधी महाविद्यालयात ‘एआय इन एज्युकेशन – हाऊ स्टुडंट्स कॅन युज एआय टूल्स’ या महत्त्वपूर्ण विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले. नव्या तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थ्यांनी एआयचा योग्य आणि जबाबदार वापर करावा, यासाठी मार्गदर्शन करण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. विद्यार्थ्यांचा मोठा सहभाग आणि तज्ज्ञांचे मार्गदर्शन यामुळे कार्यक्रमाला उत्साहपूर्ण वातावरण लाभले.

कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून जी. एच. रायसोनी इंजिनिअरिंग कॉलेज, जळगावचे आयटी-डीएस विभागप्रमुख डॉ. निलेश वसंत इंगळे, विधी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. नयना महाजन उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात एस. आर. रंगनाथन यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून झाली. त्यानंतर अतिथींचे स्वागत पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले.

डॉ. निलेश इंगळे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना एआय साधनांचा शिक्षणात प्रभावी वापर कसा करावा याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. अभ्यासात एआयचा उपयोग, वेळेचे व्यवस्थापन, संशोधनातील मदत, सुरक्षित वापराचे नियम आणि एआय वापरातील प्रामाणिकपणाचे महत्त्व यावर त्यांनी प्रकाश टाकला. तसेच आगामी करिअर संधींमध्ये एआयचे वाढते स्थानही त्यांनी विद्यार्थ्यांना स्पष्ट केले.
चर्चासत्राचे आयोजन समन्वयक ग्रंथपाल डॉ. ईश्वर सुभाष राणे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. सूत्रसंचालन आणि स्वागतपर भाषण बी.ए. एल.एल.बी. प्रथम वर्षाच्या विद्यार्थिनी देवशी साराफ हिने केले, तर आभार बी.ए. एल.एल.बी. तृतीय वर्षाच्या ऋतुजा भिडे यांनी मानले. कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व शिक्षकवर्ग आणि विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.



