जळगाव–लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरात भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव नागरिकांसाठी गंभीर धोक्याचा विषय ठरत असून, दिवसा ढवळ्या रस्त्यावर चालणे अवघड झाले आहे. अलीकडील काळात भटक्या कुत्र्यांच्या अचानक होणाऱ्या हल्ल्यांमुळे नागरिक जखमी होत असून काही घटनांत जीवितहानीही झाली आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेकडे तातडीने कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार गट)चे कार्याध्यक्ष संग्रामसिंह सुर्यवंशी यांनी केली आहे. या संदर्भातील निवेदन गुरुवार (२० नोव्हेंबर) रोजी आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांना देण्यात आले.

निवेदनानुसार, शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या दरवर्षी वाढत असून महापालिकेने नियुक्त केलेल्या एजन्सी आणि कर्मचाऱ्यांकडे अनुभवाचा अभाव दिसून येतो. तसेच पकड मोहीम राबवताना त्यांच्याकडे असलेली उपकरणे जुनी व अपुरी असल्याने ही मोहीम निष्प्रभ ठरत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. परिणामी नागरिकांना रोजच्या प्रवासात अनपेक्षित हल्ल्यांचा धोका वाढला आहे.

निवेदनात नुकत्याच घडलेल्या एका धक्कादायक घटनेचा उल्लेख करण्यात आला आहे ज्यात पाच वर्षांच्या मुलावर भटक्या कुत्र्यांच्या टोळीने हल्ला करत त्याचे लचके तोडल्याने त्याला गंभीर दुखापत झाली. या घटनेने जनमानसात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पालकांच्या सुरक्षाभावनेवर मोठा परिणाम झाला आहे.
नागरिकांनी स्पष्टपणे नमूद केले आहे की, शहरातील परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असून, रात्री बाहेर पडणे तर अशक्य बनले आहे. प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही कायमस्वरूपी तोडगा निघत नसल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे. त्यांनी भटक्या कुत्र्यांची त्वरित पकड मोहीम, जनावरांचे निर्बीजीकरण, पुनर्वसन केंद्रांची उभारणी आणि शहरातील सर्वाधिक संवेदनशील भागांत सतत गस्त वाढवण्याची मागणी केली आहे.
तसेच, भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यांमुळे जखमी होणाऱ्या प्रत्येक पीडिताला महापालिकेकडून तत्काळ १० हजार रुपये भरपाई देण्यात यावी, अशीही ठाम मागणी करण्यात आली आहे. नागरिकांच्या मते, सातत्याने वाढणाऱ्या या घटनांमुळे प्रशासनाने केवळ मोहिमा न राबविता दीर्घकालीन धोरणात्मक योजना तयार करणे अत्यावश्यक झाले आहे.
निवेदनावर एजाज मलिक, किरण राजपूत, रिंकू चौधरी, अशोक लाडवंजारी, गौरव वाणी, डॉ. रिझवान, गौरव, मतीन सय्यद, प्रसाद पाटील, गणेश पाटील आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.



