Home प्रशासन नगरपालिका वरणगाव नगरपरिषदेत १३ नगराध्यक्ष तर १२३ उमेदवार नगरसेवक पदासाठी रिंगणात

वरणगाव नगरपरिषदेत १३ नगराध्यक्ष तर १२३ उमेदवार नगरसेवक पदासाठी रिंगणात

0
241

वरणगाव- दत्तात्रय गुरव । वरणगाव नगर परिषदेची निवडणूक राजकीय पटलावर चांगलीच रंगली असुन या निवडणूकीत भाजपाने अनेक निष्ठावंताची उमेदवारी नाकारली आहे . यामुळे अनेकांनी शिवसेना ( शिंदे गट ) व राष्ट्रवादी ( शप ) गटाचा झेंडा हाती घेत आपली उमेदवारी दाखल केली असल्याने हि निवडणूक चांगलीच चर्चेत आली असुन १३ नगराध्यक्ष तर १२३ उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात आहेत . यामध्ये खरे चित्र माघारीच्या दिवसानंतर स्पष्ठ होणार असलेतरी भाजपाचे निष्ठावंत समजले जाणारे माजी नगराध्यक्ष सुनिल काळे यांनी आपल्यावर अन्याय झाल्याचा टाहो फोडीत आपल्या अपक्ष उमेदवारीचा प्रचार सुरू केला आहे . यामुळे वरणगांव वासीयांच्या भुवया उंचावल्या गेल्या असुन शहरासह परिसरातील नागरीकांचे नगर परिषदेच्या या निवडणूकीकडे लक्ष केंद्रित झाले आहे .

वरणगाव नगर परिषदेची यंदाची ही दुसऱ्यांदा निवडणूक होत असुन या निवडणूकीमध्ये एक लोकनियुक्त नगराध्यक्ष आणि २१ नगरसेवक पदासाठी शहर वासीयांना आपल्या मतदानाचा हक्क बजवावा लागणार आहे . मात्र, या निवडणूकीत नगराध्यक्ष व १२३ नगरसेवक पदासाठीच्या उमेदवारीचे अर्ज नगर परिषदेच्या निवडणूक प्रशासनाकडे वैध ठरले आहेत . यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या निवडणूकीत भाजपाने अनेक निष्ठावंताची उमेदवारी झुगारून नविन चेहऱ्यांना संधी देण्याचा प्रयत्न केला आहे . त्याच प्रमाणे राष्ट्रवादी ( शरदचंद्र पवार गट ) व शिवसेना ( शिंदे गट ) यांनाही काही नवख्या चेहऱ्यांना संधी देत भाजपातील नाराजवंताना आपल्या पक्षाकडून उमेदवारी देत त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे . मात्र, चित्र माघारीच्या दिवसानंतर समोर येणार असलेतरी ज्यांचे उमेदवारी अर्ज वैध ठरले आहेत त्यांनी आपआपल्या प्रभागात प्रचाराला सुरुवात केली असुन मतदारांच्या गाठीभेटीवर भर दिली आहे . यामुळे जिल्ह्याच्या राजकीय पटलावर वरणगाव नगर परिषदेची हि निवडणूक चांगलीच रंगली असल्याने शहरात या निवडणूकीचे राजकीय वादळ चांगलेच गाजत आहे .

जातीचे व पैशाचे राजकारण ?

दुसऱ्यांदा होत असलेल्या नगर परिषदेच्या या निवडणूकीत चांगल्याच राजकीय घडामोडी होत आहेत. दरम्यान, भाजपाचे माजी नगराध्यक्ष व मंत्री ना गिरीश महाजन यांचे खंदे समर्थक सुनील काळे यांना उमेदवारी नाकारल्याने राजकीय खळबळ उडाली. काळे यांनी ”जातीच्या समीकरणाचा व आर्थिक निकषाचा मी बळी ठरलो” असा आरोप करून भावनिक पवित्रा घेत अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्धार जाहीर केला आहे. लोकसहभाग आणि लोकवर्गणीतून निवडणूक लढवण्याचा संकल्प त्यांनी मांडला असून पाणीप्रश्न मार्गी लावल्याचा दावा करत मतदारांच्या भावनांशी नाळ जुळवण्याचा प्रयत्न सुरू आहे.

तर दुसरीकडे राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री ना.संजय सावकारे यांचे कट्टर समर्थक समजले व हिंदुत्वनिष्ठ असलेले गणेश धनगर यांनाही उमेदवारी नाकारल्याने त्यांनी शिवसेनेकडून आपली उमेदवारी दाखल केली असून या निवडणूकीत खऱ्या अर्थाने लोकनियुक्त नगराध्यक्ष पदासाठी राजेंद्र चौधरी ( शरदचंद्र पवार गट ), शिवसेनेचे जिल्हाप्रमुख समाधान महाजन सर यांच्या सौभाग्यवती तृप्ता महाजन ( शिवसेना शिंदे गट ), सामाजिक कार्यकर्ते अतुल झांबरे यांच्या सौभाग्यवती व जिल्हा दुध संघाच्या संचालीका श्यामल झांबरे ( भाजपा ) तसेच अपक्षांपैकी सुनिल काळे यांच्यातच खरी चौरंगी लढत होणार असल्याची चर्चा रंगात आली आहे .

माघारीसाठी अनेकांना घातली जातेय गळ

नगर परिषदेच्या या निवडणुकीत १३ नगराध्यक्ष व १२३ नगरसेवक पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने या निवडणूकीत चांगलीच रंगत आली आहे . यामध्ये काही राजकीय पक्षाच्या माध्यमातून जातीय समीकरणाच्या आधारे प्रतिस्पर्धी उमेदवाराला वेगवेगळ्या प्रकारचे प्रलोभने दाखवून माघारीसाठी गळ घातली जात आहे. मात्र, काही अपक्ष कट्टर उमेदवार कुठल्याही भुलथापांना बळी न पडता आपले राजकीय अस्तित्व आजमावण्याच्या तयारीत आहेत. काही महिला उमेदवारांचाही या लढतीत मोठा सहभाग असून त्यांच्या पतींनीही प्रचारासाठी कंबर कसली आहे. तर दुसरीकडे
निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर आर्थिक उलाढालीच्या चर्चांनी राजकीय वातावरण आणखी तापले आहे.


Protected Content

Play sound