जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरात एक अत्यंत संतापजनक आणि माणुसकीला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. पोलीस दलातील एका महिला कॉन्स्टेबलच्या १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिच्या सैन्य दलातून निवृत्त झालेल्या सावत्र पित्यानेच वारंवार पाशवी लैंगिक अत्याचार केल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.

व्हिडिओची धमकी देऊन अत्याचार:
संशयित आरोपी देवेंद्रसिंग कुवरसिंग जिना (वय अंदाजे ४५, रा. नैनीताल, उत्तराखंड) याने सुमारे ३-४ वर्षांपूर्वी पीडितेच्या आईशी तिसरा विवाह केला होता. फेब्रुवारी २०२५ मध्ये उत्तराखंडमध्ये असताना या क्रूर बापाने पीडित मुलीचा अंघोळ करतानाचा व्हिडिओ गुपचूप तयार केला. हा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन त्याने सर्वप्रथम मुलीवर अत्याचार केला. बदनामीच्या भीतीने मुलीने हे भयावह कृत्य कोणालाही सांगितले नाही.

पोलिस वसाहतीतही क्रूर कृत्य:
ऑगस्ट २०२५ मध्ये संशयित आरोपी जळगाव येथील पोलीस वसाहतीत आला असता, त्याने मुलीची आई बाहेर गेल्याची संधी साधून पुन्हा एकदा तो व्हिडिओ दाखवत धमकावले आणि मुलीवर लैंगिक अत्याचार केला. शनिवारी (१५ नोव्हेंबर) आरोपीचा पत्नीसोबत वाद झाल्यानंतर त्याने व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली. यातूनच पीडितेच्या आईला मुलीसोबत झालेल्या कुकर्माची माहिती मिळाली आणि त्यांना मोठा धक्का बसला.
तक्रार नोंदवताना पोलिसांची टाळाटाळ:
पीडितेच्या आईने एका सामाजिक कार्यकर्त्यांसह सोमवार, १७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी जिल्हापेठ पोलीस स्टेशन गाठले. मात्र, पोलिसांकडून सुरुवातीला तक्रार नोंदवून घेण्यास कमालीची टाळाटाळ करण्यात आली. ‘घटना जळगावला घडली का’ असे वारंवार विचारून महिलेला गोंधळात पाडण्याचा प्रयत्न झाला. अखेर, सामाजिक कार्यकर्त्यांच्या पाठपुराव्यानंतर आणि घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन उपविभागीय पोलिस अधिकारी नितीन गणापुरे यांनी मध्यरात्रीपर्यंत लक्ष घातले. त्यांच्या हस्तक्षेपानंतर मंगळवारी १८ नोव्हेंबर रोजी पहाटे ३ वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध ‘पोक्सो’ (POCSO Act) अंतर्गत बलात्काराचा ‘शून्य’ क्रमांकाने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपासासाठी हा गुन्हा नैनीताल येथे वर्ग करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या घटनेमुळे पोलीस दलासह संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.



