Home Cities जळगाव गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘जीवन संजीवनी’ सीपीआर प्रशिक्षण

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘जीवन संजीवनी’ सीपीआर प्रशिक्षण

0
108


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी। गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय, जळगाव येथे रोटरी क्लब जळगाव आणि सोसायटी ऑफ अनेस्थेशिऑलॉजिस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने ‘जीवन संजीवनी’ आपत्कालीन उपचार व CPR प्रशिक्षण कार्यक्रम अत्यंत उत्साहात पार पडला. १४ नोव्हेंबर २०२५ रोजी झालेल्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष जीवन वाचविण्यासाठी आवश्यक असलेल्या प्राथमिक उपचारांच्या महत्त्वपूर्ण तंत्रांची माहिती मिळाली.

या कार्यक्रमासाठी रोटरी क्लब अध्यक्ष गिरीश कुलकर्णी, सचिव सुभाष अमळनेरकर, कार्यकारी सचिव पंकज व्यवहारे, देवगिरी प्रांत मेडिकल विभाग प्रमुख व MD/ICU स्पेशॅलिस्ट डॉ. लीना पाटील, जनरल फिजिशियन डॉ. सुनील सुर्यवंशी, डॉ. जयश्री राणे तसेच श्री. सुबोध सराफ हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील यांचीही महत्त्वपूर्ण उपस्थिती कार्यक्रमाला लाभली.

कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या परिचयाने झाली. विद्यार्थ्यांना संबोधित करताना रोटरी क्लबचे अध्यक्ष गिरीश कुलकर्णी म्हणाले की, “आपत्कालीन प्रसंगी पहिल्या काही मिनिटांत दिलेली योग्य मदत जीवनदान ठरते. प्रत्येक तरुणाने मूलभूत वैद्यकीय ज्ञान आणि प्राथमिक उपचार कौशल्य आत्मसात करणे आवश्यक आहे.” त्यांनी ‘गोल्डन मिनिट्स’चे महत्त्व अधोरेखित केले.

सीपीआर म्हणजे काय, कोणत्या परिस्थितीत ते करावे व त्याची योग्य पद्धत याबद्दल डॉ. लीना पाटील यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. हृदय बंद पडल्यास घ्यावयाची तातडीची पावले, छाती दाबण्याची वैज्ञानिक पद्धत, श्वसन पुनर्संचय (rescue breaths) तसेच शांतचित्त राहून योग्य तंत्राने केलेल्या कृतीचे महत्त्व त्यांनी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष उदाहरणांसह समजावून सांगितले.

प्रात्यक्षिक सत्रात कोमात असलेल्या व्यक्तीची प्रतिसादक्षमता तपासणे, पल्स तपासणी, श्वासमार्ग खुले करणे, तसेच CPR योग्य पद्धतीने देणे याबाबत विद्यार्थ्यांना हाताळणी प्रशिक्षण देण्यात आले. विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेत वास्तविक आपत्कालीन प्रसंगात कशी तत्पर प्रतिक्रिया द्यावी हे शिकले.

कार्यक्रमाचे समन्वयक डॉ. ललिता पाटील यांनी संपूर्ण प्रशिक्षणाची आखणी केली. कार्यक्रमासाठी AI & DS विभाग प्रमुख डॉ. अनिलकुमार विश्वकर्मा यांनी विशेष सहकार्य केले. सूत्रसंचालन प्रा. खुशाली बेलदार यांनी देखणेपणाने पार पाडले. कार्यक्रमाचा समारोप आभार प्रदर्शनाने झाला. प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील यांनी विद्यार्थ्यांना हे प्रशिक्षण समाजहितासाठी वापरण्याचे आवाहन केले आणि महाविद्यालय यापुढेही असे उपयुक्त कार्यक्रम राबवत राहील, असे आश्वासन दिले.

गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, सचिव डॉ. वर्षा पाटील, सदस्य डॉ. केतकी पाटील, कार्डिओलॉजिस्ट डॉ. वैभव पाटील व डॉ. अनिकेत पाटील यांनी या उपक्रमाच्या आयोजनाचे कौतुक करत विद्यार्थ्यांमध्ये आपत्कालीन स्थितीत सजगता आणि जबाबदारी निर्माण करणारा हा कार्यक्रम अत्यंत गरजेचा असल्याचे मत व्यक्त केले.


Protected Content

Play sound