जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । बालदिनाच्या औचित्याने शहरातील श्री स्वामी समर्थ विद्यालय, आव्हाने शिवार येथे विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ‘पुन्हा शिवाजी राजे भोसले’ या चित्रपटाचे विशेष प्रदर्शन आयोजित करण्यात आले. बालकांना संस्कारमूल्ये, शौर्य आणि इतिहासाची थोर परंपरा समजावी या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.

हा कार्यक्रम आमदार राजूमामा भोळे आणि श्री स्वामी समर्थ विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित झाला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रम, नेतृत्वगुण आणि आदर्श मूल्यांवर आधारित चित्रपट पाहताना विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना आणि प्रेरणा ओसंडून वाहत असल्याचे दृश्य पाहायला मिळाले. इतिहासातील गौरवशाली क्षणांचे चित्रण पाहून विद्यार्थी मंत्रमुग्ध झाले.

या प्रसंगी श्री स्वामी समर्थ संस्थेचे अध्यक्ष मनोज पाटील, शाळेच्या मुख्याध्यापिका हर्षाली पाटील तसेच शिक्षक उपस्थित होते. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना चित्रपटातील शिकवणी समजावून सांगत मूल्याधिष्ठित शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. विद्यार्थ्यांनीही चित्रपटाबद्दल उत्साह व्यक्त करत अशा कार्यक्रमांनी त्यांचा आत्मविश्वास, विचारशक्ती आणि व्यक्तिमत्त्व विकासाला मदत होते, असे सांगितले.



