जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ आणि सुजाण निर्णय घेणे हे आरोग्य क्षेत्रातील अत्यंत महत्त्वाचे अंग आहे. याच दृष्टीने महादेव हॉस्पिटलतर्फे नव्या तंत्रज्ञानासोबतच आपत्कालीन व्यवस्थापनाचे सखोल ज्ञान देण्यासाठी एकदिवसीय प्रशिक्षण सत्र आयोजित करण्यात आले. सतत बदलणाऱ्या वैद्यकीय तंत्रज्ञानाच्या पार्श्वभूमीवर रुग्णालयातील कर्मचारी आणि तज्ज्ञ डॉक्टर यांनी या प्रशिक्षणातून प्रत्यक्ष कौशल्य आत्मसात करण्याची संधी मिळवली.

डॉ. रविंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवार (१४ नोव्हेंबर) रोजी हा उपक्रम राबविण्यात आला. प्रशिक्षण सत्रात डॉ. सिद्धेश खांडे, डॉ. सय्यद झीशान आणि डॉ. आकांक्षा पाटील यांनी आपत्कालीन परिस्थीतीत त्वरित आणि प्रभावी प्रतिसादाचे महत्व उलगडून सांगितले. यावेळी मनुष्य पुतळ्याच्या साहाय्याने सीपीआरचे प्रात्यक्षिक देत आपत्कालीन क्षणी रुग्णाला पुढील इजा कशी टाळावी, योग्य हस्तक्षेपामुळे रुग्णांची स्थिती कशी सुधारू शकते, तसेच वेळेवर केलेली मदत जीव वाचवण्यासाठी कशी निर्णायक ठरते याची सविस्तर माहिती देण्यात आली. प्रशिक्षणामुळे नर्सिंग कर्मचारी अधिक आत्मविश्वासाने गंभीर परिस्थिती हाताळण्यास सक्षम झाल्याचे दिसून आले.

नवीन तंत्रज्ञानाचा वेगाने होणारा विकास आणि कामाच्या व्यापामुळे ते शिकण्यासाठी वेळ न मिळाल्याची खंत कर्मचारी व्यक्त करतात. मात्र या प्रशिक्षण सत्रामुळे रुग्णालय व्यवस्थापनाने उपलब्ध करून दिलेली सुविधा अतिशय उपयुक्त असल्याचे समाधान सिस्टर चिन्मया चौधरी यांनी व्यक्त केले. वेळोवेळी अशा उपक्रमांची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले.
एमबीबीएस अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतरही अशा प्रशिक्षणातून तांत्रिक ज्ञान अधिक परिपूर्ण होते आणि वैद्यकीय निर्णयक्षमता वाढते, अशी भावना रुग्णालय व्यवस्थापक डॉ. संस्कृती भिरूड यांनी व्यक्त केली. आजचे प्रशिक्षण हे ज्ञानवर्धक असून सर्व कर्मचारी याचा प्रत्यक्ष कामात मोठ्या प्रमाणावर लाभ घेतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.



