पटणा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा । बिहार विधानसभा निवडणुकीतील सर्वाधिक चर्चेत असलेल्या ‘हॉट सीट’ राघोपूरमध्ये अखेरच्या क्षणी नाट्यमय बदल घडला असून, सतत पिछाडीवर चाललेले राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी निर्णायक क्षणी मोठी आघाडी घेतली आहे. दीर्घकाळ तणावपूर्ण झालेल्या मतमोजणी प्रक्रियेत राघोपूर मतदारसंघाचे चित्र अखेर बदलले असून, आता तेजस्वी यादव यांचा विजय जवळपास निश्चित मानला जात आहे.

मतमोजणीच्या सुरुवातीपासून भाजपचे उमेदवार सतीश कुमार आघाडीवर होते. फेऱ्या पुढे सरकताना ही आघाडी वाढत गेल्याने लालू यादव कुटुंबाची प्रतिष्ठा धोक्यात आली होती. राघोपूर हे पारंपारिकदृष्ट्या यादव कुटुंबाचे बालेकिल्ला मानले जात असतानाच सतीश कुमार यांनी तेजस्वींना सतत मागे टाकल्याने हा सामना चुरशीचा बनला होता. त्यामुळे राज्यभरात या मतदारसंघाच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

मात्र, २२व्या फेरीपासून परिस्थिती बदलायला सुरुवात झाली. २२व्या फेरीअखेर तेजस्वींनी ८५२३ मतांची आघाडी घेतली आणि पुढील २३व्या फेरीत ही आघाडी तब्बल ११४८१ मतांवर पोहोचली. या आकड्यांनी आरजेडी कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण निर्माण केले असून, तेजस्वी यादव यांचा विजय आता जवळपास ठरल्याचे मानले जात आहे. सततच्या पिछाडीतून बाहेर पडत केलेल्या या पुनरागमनाने तेजस्वींनी पुन्हा एकदा आपली राजकीय ताकद दाखवून दिली आहे.
अखेरीस सात राऊंड अद्याप बाकी असले तरीही तेजस्वी यांच्या विजयाची शक्यता अधिक बळकट झाली आहे. २०२० च्या निवडणुकीत तेजस्वींनी याच सतीश कुमारांचा पराभव केला होता, तर २०१० मध्ये सतीश कुमार यांनी जेडीयू उमेदवार म्हणून राबडी देवी यांचा १३,००६ मतांनी पराभव करत मोठी राजकीय उलथापालथ घडवली होती. यंदा मात्र ते एनडीएतर्फे भाजपचे उमेदवार म्हणून मैदानात उतरले होते.



