Home Cities मुक्ताईनगर मुक्ताईनगर नगरपंचायत निवडणुकीसाठी विकास ‘अप्पा’ नाईक यांचा अर्ज दाखल

मुक्ताईनगर नगरपंचायत निवडणुकीसाठी विकास ‘अप्पा’ नाईक यांचा अर्ज दाखल

0
268


मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । मुक्ताईनगर नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर आज शहरात निवडणूक वातावरण तापले असून प्रभाग क्रमांक 13 मधून शिवसेना (शिंदे गट) तर्फे विकास नाईक उर्फ ‘अप्पा’ नाईक यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. मोठ्या उत्साहात आणि समर्थकांच्या उपस्थितीत झालेल्या या अर्ज दाखल प्रक्रियेकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले होते.

अर्ज दाखल करण्यासाठी विकास नाईक यांनी प्रभागातील नागरिक, असंख्य मित्रमंडळी आणि कार्यकर्त्यांसोबत मिरवणुकीच्या स्वरूपात तहसील कार्यालय गाठले. ढोल-ताशांच्या गजरात, जयघोषांच्या वातावरणात झालेल्या या प्रक्रियेने निवडणुकीचा माहोल अधिक रंगतदार बनला. स्थानिक नागरिक तसेच कार्यकर्त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल होताच जल्लोष करीत त्यांचे मन:पूर्वक स्वागत केले.

प्रभाग क्रमांक 13 मध्ये गेल्या कित्येक वर्षांपासून विकासकामांचा प्रश्न प्रलंबित असल्याचे नाईक यांनी यावेळी निदर्शनास आणून दिले. पाणीपुरवठा, रस्त्यांची अद्ययावत दुरुस्ती, ड्रेनेज व्यवस्था आणि स्वच्छतेसह महत्वाची कामे मार्गी लावण्यास प्राधान्य देण्याचे आश्वासन त्यांनी नागरिकांना दिले. नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करणे आणि प्रभागाचा सर्वांगीण विकास हा आपला मुख्य ध्यास राहील, असे ते म्हणाले.

निवडणूक अधिकाऱ्यांकडे अर्ज दाखल केल्यानंतर नाईक यांनी माध्यमांशी संवाद साधत नागरिकांचा प्रतिसाद अभूतपूर्व असल्याचे सांगितले. “प्रभाग क्रमांक 13 च्या विकासाची गती वाढवण्यासाठी आणि लोकांच्या अडचणी सोडवण्यासाठी मी कटिबद्ध आहे. नागरिकांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही,” असे ते म्हणाले.

दरम्यान, त्यांच्या अर्ज दाखल कार्यक्रमाला विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, स्थानिक कार्यकर्ते तसेच ज्येष्ठ नागरिकांनीही हजेरी लावून पाठिंबा दर्शविला. त्यामुळे आगामी निवडणुकीत प्रभाग क्रमांक 13 मध्ये चुरस अधिक वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


Protected Content

Play sound