जळगाव–लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील पांजरापोळ संस्थेत सुरू असलेल्या पाच दिवसीय भव्य अलौकिक गौकथेचा तिसरा दिवस आज अत्यंत श्रद्धा, भक्तिभाव आणि अध्यात्मिक उर्जेने साजरा करण्यात आला. या प्रसंगी गोमातेची सुंदर चुनरी अर्पण करून विशेष सन्मान करण्यात आला. उपस्थित भाविकांनी या सोहळ्याचा लाभ घेत “गोमातेच्या चरणी” कृतार्थतेचा अनुभव घेतला.

या वेळी पूज्य साध्वी कपिला गोपाल सरस्वती दीदी यांनी भाविकांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. त्यांनी आपल्या प्रभावी प्रवचनात सांगितले की, देवलोक असो वा भारतीय संस्कृती, त्यात सर्वश्रेष्ठ स्थान हे गोसेवेला देण्यात आले आहे. गाई ही फक्त एक प्राणी नसून ती संपूर्ण सृष्टीचे पोषण आणि पर्यावरणाचे संतुलन राखणारी शक्ती आहे. पुराणातील उदाहरणे देत त्यांनी स्पष्ट केले की, पर्यावरण संतुलन आणि सकल हिंदुराष्ट्राच्या उन्नतीसाठी गोरक्षण अत्यावश्यक आहे.

दीदी म्हणाल्या की, आजच्या वेगवान आणि प्रदूषणयुक्त जीवनशैलीत गाईंचे महत्त्व अधिक वाढले आहे. गाईंची सेवा ही फक्त धार्मिक कृती नसून ती मानवतेचा सर्वोच्च धर्म आहे. शारीरिक व्याघी असलेल्या गाईंची सेवा करणाऱ्यास परम पुण्याची सहज प्राप्ती होते, असे त्यांनी सांगितले.
या पाच दिवसीय गौकथेला शहरातील नागरिक, महिला मंडळे आणि श्रद्धावान भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. पांजरापोळ संस्था आणि माहेश्वरी महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने या आयोजनाचे नियोजन करण्यात आले आहे.
दरम्यान, दिनांक 14 नोव्हेंबर शुक्रवार रोजी या कथेदरम्यान गोमातेकरिता छप्पन भोग अर्पण करण्याचा विशेष सोहळा पार पडणार आहे. हा पुण्यप्रसंग पाहण्यासारखा असून भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.



