Home Cities जळगाव लेवा भवनमधून विष्णू भंगाळे यांनी २० कोटींची माया कमावली; पियुष पाटलांनी केला...

लेवा भवनमधून विष्णू भंगाळे यांनी २० कोटींची माया कमावली; पियुष पाटलांनी केला आरोप

0
275

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील प्रसिद्ध सरदार वल्लभभाई पटेल हॉल (लेवा भवन) पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. पियुष पाटील यांनी माजी महापौर विष्णू रामदास भंगाळे यांच्यावर गंभीर आरोप करत म्हटले आहे की, गेल्या २० वर्षांपासून लेवा भवनच्या माध्यमातून भंगाळे यांनी मनपा मालकीच्या जागेतून तब्बल २० कोटींची बेकायदेशीर कमाई केली आहे. समाजाच्या नावाखाली वैयक्तिक संपत्ती कमावण्याचा हा प्रकार असल्याचा आरोप पाटील यांनी केला आहे.

लेवा भवन हे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी वसलेले असून, ती जागा प्रत्यक्षात जळगाव महानगरपालिकेची मालकीची ‘ओपन स्पेस–ग्रीन झोन’ क्षेत्रातील आहे. माननीय उच्च न्यायालयाच्या म्हणण्यानुसार ही जागा त्या परिसरातील प्लॉटधारकांच्या अधिकारात येते. तरीसुद्धा दोन दशकांपूर्वी मनपाने ठराव करून भंगाळे यांच्या संस्थेला “गेम हॉल” बांधण्यासाठी ती जागा विकसित करण्यास दिली होती. यानंतर या ठिकाणी खासदार, आमदार आणि DPDC निधीतून विविध विकासकामे करण्यात आली.

पियुष पाटील यांच्या म्हणण्यानुसार, या हॉलमध्ये दरवर्षी शंभराहून अधिक विवाहसोहळे आणि विविध व्यावसायिक कार्यक्रम होतात. प्रत्येक लग्नासाठी दोन दिवसांचे भाडे ८० हजार ते १ लाख रुपये आकारले जाते. तसेच, योगा आणि झुंबा क्लासेससाठी हॉल दरमहा ५० हजार रुपयांना भाड्याने दिला जातो. या सर्व उत्पन्नाचा विचार केला तर दरवर्षी सुमारे एक कोटी रुपये आणि गेल्या २० वर्षांत सुमारे २० कोटी रुपये भंगाळे यांनी कमावले असल्याचा दावा पाटील यांनी केला आहे. त्यांनी प्रश्न उपस्थित केला आहे की, “या प्रचंड उत्पन्नातून महानगरपालिकेला किती रक्कम जमा करण्यात आली आहे, याचा खुलासा भंगाळे यांनी करावा.”

पाटील पुढे म्हणाले की, “लेवा भवन हे समाजाच्या नावावर उभे असले तरी त्याचा वापर वैयक्तिक फायद्यासाठी केला जात आहे. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नावाने उभारलेल्या या ठिकाणाचा राजकीय फायद्यासाठी उपयोग करणे हे समाजाच्या सन्मानाला धक्का पोहोचवणारे आहे. भंगाळे यांनी समाजाचा आधार घेऊन असे गलिच्छ राजकारण करू नये. त्यांच्या परिवाराला हे शोभणारे नाही.”

तसेच, विष्णू भंगाळे यांनी दिलेले निवडणूक लढण्याचे आव्हान मी स्वीकारतो, असेही पियुष पाटील यांनी स्पष्ट केले. “मी माझ्या नावाने तक्रार अर्ज दिलेला असून त्यात काहीही गुप्त नाही. भंगाळे यांनी जाहीर आव्हान दिले असल्यास मी त्यासाठी तयार आहे,” असे ते म्हणाले.

याचबरोबर पाटील यांनी भंगाळे यांच्यावर निवडणुकीत फसवणुकीचे आरोप करत सांगितले की, “गेल्या दोन पंचवार्षिक निवडणुकांदरम्यान माझ्या वडिलांच्या विरोधात भंगाळे लढत होते, तेव्हा आम्ही त्यांच्या प्रभागात सुमारे ३८०० बोगस मतदार ओळखले होते. पराभव टळावा म्हणून त्यांनी मागे पाऊल घेतले. आता पुन्हा या प्रभागात अंदाजे २५०० बोगस मतदारांची नावे समाविष्ट करण्यात आली आहेत, याचा खुलासा आम्ही लवकरच करणार आहोत.”

पियुष पाटील यांनी ठामपणे सांगितले की, “विष्णू भंगाळे हे केवळ बोगस मतदानाच्या आधारावर निवडून येत आहेत. आम्ही लवकरच हे सर्व पुरावे जनतेसमोर आणणार असून, याबाबत कायदेशीर हरकत घेणार आहोत.”


Protected Content

Play sound