रावेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी l येथील माजी नगराध्यक्ष दारा मोहम्मद यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश केला असून यामुळे ते घड्याळाच्या निशाणीवर नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरणार का ? याबाबत चर्चेला उधाण आले आहे.
आज रावेर येथे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वतीने पक्षप्रवेश कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला पक्षाचे जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे, सावद्याचे माजी नगराध्यक्ष राजेश वानखेडे, जिल्हा सरचिटणीस विवेक ठाकरे, युवकचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

या कार्यक्रमात रावेर शहराचे माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष दारा मोहम्मद आणि त्यांचे पुत्र आसिफ मोहम्मद यांनी आपल्या समर्थकांसह राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात प्रवेश घेतला. दारा मोहम्मद हे रावेरच्या राजकारणातील एक बडे प्रस्थ मानले जाते. रावेर शहरात मुस्लिम समाजाची मते ही निर्णय असल्यामुळे ते आगामी नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वतीने निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता बळावली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.



